गडचिरोली : देसाईगंजच्या पूर्वेकडील गावांच्या शेजारी असलेल्या जंगलात रानटी हत्तींनी गेल्या महिनाभरापासून ठाण मांडल्याने शेतशिवारातील त्यांचा वावर शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. सध्या रब्बी पिके शेतात आहेत. दिवसभर जंगलात राहणाऱ्या हत्तींनी २९ फेब्रुवारीच्या रात्री आपला अरततोंडी येथील शेतशिवाराकडे मोर्चा वळवून मका मोडला, धान बांध्यांत गाडले, गहू चन्यालाही मातीमोल केले. त्यामुळे शेतकऱ्यांसह वनविभाग देखील हतबल झाला आहे.
सध्या शेतकऱ्यांनी मका, धान, गहू, चना, उडीद, मूग तसेच विविध भाजीपाला व इतर कडधान्य पिकांची लागवड केली आहे. यातील काही पिके आता काढणीस आली आहेत. परंतु २९ फेब्रुवारीच्या रात्री तर हत्तींच्या कळपाने कहरच केला. वडसा वनपरिक्षेत्र अंतर्गत पळसगाव-डोंगरगाव (ह.) वनक्षेत्र क्रमांक ८४, ८५ मध्ये दिवसा हत्तींचा मुक्काम होता. त्याच रात्री अंदाजे ९:३० वाजेच्या दरम्यान महादेव पहाडीमार्गे अरततोंडी गावाला लागून असलेल्या शेतशिवारात हिरव्याकंच मका पिकांवर ताव मारत नासधूस केली. सोबतच धानपिके, चना, गहू, उडीद व अन्य पिके देखील तुडविली. तोंडाशी आलेली पिके मातीमोल झाली. बारा शेतकऱ्यांचे पीक तुडविले.रानटी हत्तींनी १२ शेतकऱ्यांच्या पिकांत धुडगूस घालून नुकसान केले. लता नंदेश्वर यांच्या दोन एकर शेतातील मका हत्तींनी जमिनीत गाडला. शिवाय गहू व धानपीक देखील कळपाने तुडविले. मारोती शेंडे यांचे धान, चना व उडीद पिके नेस्तनाबूत केली. चरणदास कोल्हे यांचे धान व बरबटीचे पीक होत्याचे नव्हते केले. वच्छला भुते यांचे मका पीक तर कुसन नंदेश्वर यांच्या धान पिकाला मातीमाेल केले. क्षेत्रसहायक म्हणतात, पंचनामे करूरानटी हत्तींनी डोंगरगाव (ह.) येथील काही शेतकऱ्यांच्या पिकाची सुद्धा नासधूस केली. याबाबत विहीरगाव वनक्षेत्राचे क्षेत्रसहायक कैलास अंबादे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात येतील व नुकसान भरपाईसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.