कोरेगाव चोप (गडचिरोली) : छत्तीसगड राज्यातून सहा महिन्यांनंतर पुन्हा एकदा गडचिरोली जिल्ह्यात आलेल्या जंगली हत्तींच्या कळपाची आगेकूच सुरूच आहे. धानोरा, कुरखेडा, देसाईगंज तालुक्यातून या हत्तींनी आपला मोर्चा गोंदिया जिल्ह्याच्या दिशेने वळविला आहे. त्यामुळे हे हत्ती गोंदियाच्या जिल्ह्यातील अर्जुनी माेरगाव तालुक्यातील केशोरी भागात प्रवेश करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कुरखेडा तालुक्यातून देसाईगंज तालुक्यातील शंकरपूर वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १०३ मध्ये हा कळप दोन दिवसांपूर्वी पोहोचला होता. त्यानंतर कोरेगाव चोप, रावनवाडी टोली परिसरातून हत्तींनी टेमलीच्या मामा तलावात जलविहार करून पैलतीर गाठला. त्यानंतर संध्याकाळी बोढध्याच्या मामा तलावाकडे हा कळप गेला. तेथून गोंदिया जिल्ह्याची सीमा ४ ते ५ किलोमीटर आहे. हत्तींची आगेकूच अशीच सुरू राहिल्यास ते कधीही केशोरी लगतच्या परिसरात पोहोचण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, वनविभाग त्या हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवून असला हत्तींनी कुठे जावे, कुठे जाऊ नये यावर त्यांचे नियंत्रण नाही. या जंगली हत्तींच्या जास्त जवळ जाणेही धोकादायक ठरू शकते. त्यामुळे त्यांच्यापासून नागरिकांनी दूरच राहावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
कुतूहल आणि दहशतही
जंगलात मुक्तविहार करणाऱ्या या हत्तींच्या कळपाबद्दल नागरिकांमध्ये कुतूहल आहे. मात्र हे हत्ती धानपीक उद्ध्वस्त करीत असल्याने तसेच घरात मोहफुले ठेवली असल्यास रात्री घराला नुकसान पोहोचविण्याची शक्यता असल्याने दहशतीचेही वातावरण आहे. त्यामुळे नागरिकांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.