गडचिराेली : तालुक्यातील माैशीखांब परिसरात ठाण मांडून बसलेल्या रानटी हत्तींनी धान पीक तुडवून शेतकऱ्यांचे स्वप्न हिरावले. आता मदतीसाठी शेतकऱ्यांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत आहे. ४८ तासांत ऑनलाइन तक्रार नोंदविणे बंधनकारक केल्याने शेतकरी भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी जाचक अटी, शर्थी शिथिल करून शेतकऱ्यांना थेट मदत करावी, अशी मागणी केली आहे.
जिल्ह्यात रानटी हत्तींनी गेल्या काही दिवसांत धुडगूस घातला आहे. आरमोरी, गडचिरोली, धानोरा तालुक्यातील पिकांचे नुकसान केले आहे. दरम्यान, आता हत्तींनी आपला मोर्चा गडचिरोली जवळील माैशीखांब, बेलगावकडे वळविला आहे.रानटी हत्तींच्या कळपात २३ सदस्य आहेत. परंतु, आता एका हत्तिणीने पिलाला जन्म दिल्याने हत्तींची संख्या २४ झाली आहे. कळपावर पश्चिम बंगालची हुल्ला टीम लक्ष ठेवून आहे. तसेच हत्तींचा वावर असलेल्या भागात जाण्यासाठी शेतकऱ्यांना मज्जाव आहे, पण रात्री-अपरात्री हत्ती धानपिकांचे नुकसान करतात.
मौशीखांबला शेतकरी चिंतामण कुरूडकार, नीलकंठ कुरूडकार, धुमदास आडबैले, तुकाराम कुकुडकर, अनिल राऊत यांच्या धानपिकांचे १५ नोव्हेंबर रोजी हत्तींनी मोठे नुकसान केले. तथापि, ४८ तास उलटूनही ऑनलाइन तक्रार न केल्याने शेतकरी मदतीविना राहण्याची शक्यता आहे. यावर युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे यांनी आक्षेप घेतला असून अटी- शर्थी रद्द करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना थेट बँक खत्यात आर्थिक भरपाईपोटी रक्कम जमा करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. या गावात पूर्णवेळ तलाठी नाही, अनेक ठिकाणी नेटवर्कच्या अडचणी आहेत, शेतकरी अशिक्षित आहेत, दुर्गम भागात या समस्या अधिक तीव्र आहेत, अशा परिस्थितीत या अटी, शर्थी शेतकऱ्यांच्या माथी का मारल्या जात आहेत, असा सवाल विश्वजित कोवासे यांनी केला आहे.
पदाधिकारी पोहोचले बांधावर
दरम्यान, १८ नोव्हेंबर रोजी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव विश्वजित कोवासे व इतरांनी मौशीखांब येथे नुकसान झालेल्या शेतात जाऊन पाहणी केली. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची कोणीही हमी घेत नाही. काँग्रेस मात्र वन्यप्राण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी यासाठी रस्त्यावरची लढाई लढण्यास सज्ज असल्याचा इशारा विश्वजित कोवासे यांनी दिला आहे.