गडचिराेली : जिल्ह्यात हिरडा, बेहडा, आवळा या फळवर्गीय वनस्पतींसह कुडा नावाची वनस्पतीही मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील जंगलात सर्वत्र आढळते. याशिवाय गावाशेजारी, तसेच जंगलात माेठ्या पिंपळाच्या झाडाचीही संख्या माेठी आहे. मात्र, दुसऱ्या झाडावर पिंपळाचा वेल असताे. पिंपळ ही वेलवर्गीय वनस्पती आहे. दुसरीकडे झुडपी जंगलामध्ये कुड्याची झाडे सर्वांत जास्त आढळून येतात. त्यामुळे ग्रामीण भागात कुड्याच्या फुलांची भाजी म्हणून सर्वांत जास्त वापर उन्हाळ्यात नागरिक करीत असतात.
सध्या गडचिराेलीच्या बाजारात कुड्याचे फुल, पिंपळाचा बार विक्रीसाठी ग्रामीण भागातील महिला आणत आहेत. या दाेन्ही भाज्यांमध्ये माेठ्या प्रमाणात जीवनसत्त्वे असल्याने शहरातील अनेक कुटुंबे ते खरेदी करताना दिसून येत आहे. आयुर्वेदात महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या अनेक औषधी वनस्पती पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलात आढळतात. जंगलात आढळणाऱ्या अनेक औषधी वनस्पतींविषयीचा आजारांवरील वापर अनभिज्ञ असल्याने जिल्ह्यातील औषधी वनस्पती दुर्लक्षितच आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिक कुड्यांच्या फुलांची भाजी तयार करून खात असतात.
उन्हाळ्याची चाहूल लागताच कुड्याच्या झाडांना फुले यायला सुरुवात होते. ५ फुटांपासून २० फुटांपर्यंत उंच असलेली अनेक झाडे जिल्ह्याच्या जंगलात आढळतात. विशेषत: झुडपी जंगलामध्ये कुड्याची झाडे जास्त आढळून येतात. त्यामुळे ग्रामीण भागात कुड्याच्या फुलांचा भाजी म्हणून सर्वांत जास्त वापर उन्हाळ्यात नागरिक करीत असतात. प्रत्येक झुडपास फांदीच्या टोकाशी मंद सुवास असलेली पांढऱ्या रंगांची फुले असलेले गुच्छ येतात. पोळ्याच्या सणादरम्यान कुड्याच्या झाडांना लांबट शेंगा जोडीने येतात. पोळ्याच्या दिवशी कुड्याच्या शेंगांची भाजी खास बैलांना शेतकरी कुड्याच्या पानांच्या पत्रावळीत खाऊ घालतात. त्यामुळे पोळ्याच्या सणाला कुड्याच्या झाडाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
कुडा आहे बहुपयोगी
कुडा ही वनस्पती महाराष्ट्रातील कोकण भागासह विदर्भात मोठ्या प्रमाणात आढळते. करड्या रंगाच्या सालीचे हे झाड असते. कुड्याच्या बियांची चव कडू व तुरट असते. औषधी म्हणून मुळाची साल व बियांचा सर्वाधिक वापर होतो. पांढऱ्या फुलांमध्ये एक कडू द्रव्य असते. कुड्यांच्या बियातही तेल व कणीदार कडू द्रव्य असते. फेब्रुवारी महिन्यापासून कुड्याच्या झाडांना फुले येण्यास सुरुवात होते, त्यामुळे पांढऱ्या फुलांच्या गुच्छांनी झाड बहरलेले असते. कुड्यात कोनेसिडिन, कोनेशिमाइन, कोनीणाइन, होलेरीन, कुर्चीन, प्रोटीन आदी रासायनिक घटक वृक्षाच्या विविध भागांत आढळतात. एकूणच कुड्याचे मूळ, खोड, पान, फूल, फळ आणि बिया बहुपयोगी असतात. बहुगुणी कुड्यामुळे वृक्षाची लागवड शेती, बांध रस्त्याच्या दुतर्फा व बगिच्यांमध्ये केली जाते.
भाजी हाेते चवदार
कुड्याचे फूल, पिंपळाचा बार हा थाेडा महाग असला तरी याची भाजी चवदार हाेत असल्याने बहुतांश नागरिक सदर भाजीची चव चाखताना दिसून येत आहे. एकूणच जंगलातील या भाज्या व रानमेव्याने शहरी भागातील नागरिकांना भुरळ पाडल्याचे दिसून येत आहे. सध्या गडचिराेली शहरात पिंपळाचा बार हा ४० ते ५० रुपयाला एक फळ या भावाने विकला जात आहे, तर कुड्याचे फूल २० रुपयाला एक फळ या दराने विक्री सुरू आहे.
महिलांना मिळालाय राेजगार
वाढत्या उष्णतेमुळे ग्रामीण व दुर्गम भागातील महिला सकाळी लवकर गावानजीकच्या झुडपी जंगलात जाऊन कुड्याचे फूल ताेडत आहेत. पिंपळाचा बार ताेडत आहेत. यातून महिलांना राेजगार उपलब्ध झाला आहे. सकाळी जंगलात जायचे व दुपारनंतर शहर गाठून कुड्याचे फूल, पिंपळाचा बार विकायचा, असा काही महिलांचा दिनक्रम झाला आहे.