दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दर चार वर्षांनी होणारी व्याघ्र व वन्यजीव प्रगणना २० ते २५ जानेवारी यादरम्यान केली जाणार आहे. नियतक्षेत्र (बिट) हे एक युनिट समजून ७३६ नियतक्षेत्रात वन्यजीव प्रगणना केली जाणार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.जंगलात नेमके किती वाघ व अन्य तृणभक्षी जीव आहेत. याचा अंदाज यावा, या उद्देशाने २००६ पासून संपूर्ण देशात व्याघ्र व वन्यजीव प्रगणना करण्यास सुरुवात झाली. दर चार वर्षांनी ही प्रगणना केली जाते. यापूर्वी सन २००६, २०१० व २०१४ मध्ये प्रगणना करण्यात आली होती. यावर्षी २० ते २५ जानेवारी दरम्यान प्रगणना केली जाणार आहे. २० ते २२ या दरम्यान मांसाहारी व मोठ्या शाकाहारी प्राण्यांची प्रगणना होईल. सदर प्रगणना पाऊलवाटांच्या मदतीने केली जाईल. शेण, पगमार्क, विष्ठा, प्राण्यांनी केलेली शिकार, लघवी आदींच्या माध्यमातून सूर्योदयापासून जवळपास ८ वाजेपर्यंत प्रगणना केली जाईल. नीलगाय, हरीण, चितळ, सांबर यासारख्या खूर असलेल्या प्राण्यांची प्रगणना दोन किमी अंतराचे ट्रांझिक्ट लाईन टाकून केली जाणार आहे. या प्रगणनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील जंगलात मागील चार वर्षात किती वन्यजीवांची संख्या वाढली किंवा कमी झाली, याचा अंदाज येण्यास मदत होणार आहे. प्रगणना योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी यापूर्वीच वनपाल व वनरक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रगणनेदरम्यान प्राप्त झालेली माहिती ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला पाठविली जाईल. त्यानंतर ती माहिती वन्यजीव संस्था डेहराडून येथे संकलित केली जाणार आहे, अशी माहिती विभागीय वनाधिकारी (दक्षता) एस.एल. बिलोविकर यांनी दिली.पक्ष्यांचीही होणार नोंदव्याघ्र व वन्यजीव प्रगणनेदरम्यान वन्यप्राण्यांसोबतच पक्ष्यांचीही पाहणी केली जाणार आहे. जंगलात एखादा नवीन पक्षी किंवा झाड आढळून आल्यास त्याचीही नोंद केली जाणार आहे. गिधाड या पक्ष्यांची प्रजातीला धोका आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील पक्ष्यांची पाहणी करताना गिधाडांची विशेष नोंद घेतली जाणार आहे.पीडीएवर बहिष्कार कायमनेमक्या कोणत्या ठिकाणी वन्यजीव आढळून आला, याची सूक्ष्म नोंद होण्यासाठी पीडीए हे संयंत्र आवश्यक आहे. मात्र वनकर्मचाऱ्यांनी पीडीए संयंत्र एक महिन्यापूर्वी वन विभागाकडे परत केले आहे. प्रगणनेदरम्यान या यंत्राचा वापर न करण्यावर ते अजूनही ठाम आहेत. त्यामुळे पीडीए संयंत्राशिवाय प्रगणना होणार आहे. सर्व माहिती गोळा होईल, मात्र वन्यजीवाचे नेमके ठिकाण माहित होण्यास अडचण निर्माण होणार आहे. वनकर्मचारी संघटना व शासन यांच्यामध्ये तोडगा निघाला नाही. त्यामुळे शुक्रवारपर्यंत वनकर्मचारी पीडीए संयंत्राचा वापर न करण्यावर ठाम होते.वनपाल व वनरक्षकांकडून शासन अनेक तांत्रिक कामे करून घेते. मात्र या कर्मचाऱ्यांना तांत्रिक कर्मचारी मानत नाही. शासनाचे इतर विभाग व वनकर्मचारी यांच्या वेतनश्रेणीत फार मोठी तफावत आहे. वनरक्षकाचे पद तलाठ्या बरोबरचे मानले जाते. मात्र त्याला शिपायापेक्षाही कमी वेतन मिळते. पीडीएचा वापर होत असला तरी कर्तव्यामध्ये नमूद नाही. वेतनश्रेणीत सुधारणा करावी, यासाठी मागील १० वर्षांपासून लढा सुरू आहे. मात्र शासनाने याकडे लक्ष दिले नाही. वनकर्मचारी प्रगणनेचा काम करतील, मात्र पीडीएचा वापर करणार नाही.- योगेश शेरेकर, जिल्हाध्यक्ष,वनरक्षक व वनपाल संघटना, गडचिरोली
७३६ बिटमध्ये होणार वन्यजीव प्रगणना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 1:01 AM
दर चार वर्षांनी होणारी व्याघ्र व वन्यजीव प्रगणना २० ते २५ जानेवारी यादरम्यान केली जाणार आहे. नियतक्षेत्र (बिट) हे एक युनिट समजून ७३६ नियतक्षेत्रात वन्यजीव प्रगणना केली जाणार असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली आहे.
ठळक मुद्देपीडीएवर बहिष्काराने वाढली अडचण : २० ते २५ दरम्यान घेणार नोंदी