देसाईगंज येथे बैठक : खासदारांची रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चादेसाईगंज : राज्य शासनाने वडसा-गडचिरोली रेल्वेमार्गासाठी अंदाजपत्रकात निधी मंजूर केल्यास जानेवारी २०१५ पासून या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरूवात होईल व पुढील तीन वर्षात या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण केले जाईल, अशी माहिती दक्षिण पूर्व रेल्वेच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी आज शनिवारी देसाईगंज नगर परिषदेच्या सभागृहात पार पडलेल्या बैठकीदरम्यान खासदार अशोक नेते यांच्याशी चर्चेदरम्यान दिली. देसाईगंज येथे खासदार अशोक नेते यांनी दक्षिण पूर्व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक वडसा-गडचिरोली या प्रलंबित रेल्वे मार्गाच्या प्रश्नाबाबत लावली होती. या बैठकीला रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यासह महसूल आणि वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. ५२ किमी लांबीचा हा रेल्वे मार्ग मागील अनेक वर्षांपासून रखडलेला आहे. ४६९ कोटी रूपये या मार्गाच्या उभारणीसाठी लागणार असून यामध्ये केंद्रशासन ५० टक्के, राज्य शासन २५ टक्के व गृहमंत्रालय २५ टक्के निधी उपलब्ध करून देणार आहे. राज्य शासनाने अंदाजपत्रकात हा निधी मंजूर केल्यास जानेवारी २०१५ पासून रेल्वे मार्गाच्या कामाला सुरूवात होईल. रेल्वे प्रशासन या मार्गासाठी सकारात्मक भूमिका ठेवून असल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. निधीच्या पूर्ततेनुसार पुढील तीन वर्षात हे काम पुढे नेले जाईल, अशी माहिती खासदार अशोक नेते यांना रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली. त्याचप्रमाणे नक्षलग्रस्त भागात सदर काम असल्याने कामाला सुरूवात झाल्यापासून ते काम पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी १०० पेक्षा अधिक पोलीस कमांडो रेल्वे अधिकाऱ्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी पार पाडेल, असेही खासदार अशोक नेते यांनी सांगितले. नागभिड-नागपूर हा १०६ किमी लांबीचा रेल्वे मार्ग ब्रॉडगेज करण्याबाबतही केंद्र सरकार सकारात्मक भूमिका घेऊन आहे. या मार्गाचे अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात यावे, अशी सूचना खासदार अशोक नेते यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिली. देसाईगंज शहरातील भूमिगत रेल्वे पुलाचे काम मंदगतीने सुरू असून या कामाविषयी अनेक तक्रारी आहेत. या कामाला प्राधान्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मार्च २०१५ पर्यंत पुलाचे काम पूर्ण होईल, असेही रेल्वे अधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितले. या बैठकीला आमदार क्रिष्णा गजबे, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, देसाईगंजचे नगराध्यक्ष शाम उईके, प्रकाश पोरेड्डीवार, देसाईगंज रेल्वे स्थानक सल्लागार समितीचे सदस्य विष्णू वैरागडे, नाना नाकाडे, रेखा डोळस, जि.प. सदस्य वर्षा कौशिक, प्रकाश अर्जुनवार, रविंद्र बावणथडे, रेल्वेचे उपविभागीय अभियंता ए. के. पांडे, सहाय्यक अभियंता ए. के. सिंग, वरिष्ठ सहाय्यक अभियंता टि मुखोपाध्याय, कमलाप्रसाद हे उपस्थित होते. या बैठकीदरम्यान खासदार अशोक नेते यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या प्रश्नाबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. रेल्वेमंत्र्याकडेही खासदार नेते पाठपुरावा करणार आहेत. (वार्ताहर)राज्य शासनाकडून केंद्र सरकारला ४० कोटी हवेतवडसा-गडचिरोली रेल्वे मार्ग वडसा येथील कब्रस्थान बायपासच्या बाजुने काढला जाणार आहे. या मार्गावर ९ रेल्वेस्थानक राहतील. आरमोरी व चुरमुरा या दोन ठिकाणी राज्य महामार्ग रेल्वे मार्गाला ओलांडून जाईल, म्हणजेच या दोन ठिकाणी रेल्वे क्रॉसींग असले. याशिवाय कोंढाळा, आरमोरी, डोंगरगाव, चुरमुरा, साखरा, गोगाव हे रेल्वेस्थानक राहतील. चुरमुरा गावापर्यंत वैनगंगा नदीला समांतर रेल्वे मार्ग जाईल. प्रत्येक ५०० मिटरवर दोन पूल दिले जातील. वडसा स्थानकावर जादाच्या पॅसेंजर गाडीकरीता व मालवाहू गाडीकरीता प्रत्येकी एक याप्रमाणे दोन रेल्वे ट्रॅक बनविण्यात येतील. राज्य शासनाने तत्काळ ४० कोटीचा निधी उपलब्ध करून दिला पाहिजे. तेव्हाच जानेवारी २०१५ पासून प्लॉटफार्मच्या कामाला सुरूवात केली जाईल, असे सुतोवात अधिकाऱ्यांनी या बैठकीत केले.राज्य सरकारने ५० टक्के निधी या मार्गासाठी देण्याची गरज आहे. परंतु आता या ५० टक्के निधीच्या वाट्यात २५ टक्के भाग गृह विभाग देईल, अशी नवीन तरतूद होण्याची शक्यता आहे.
तीन वर्षात होणार रेल्वेमार्ग
By admin | Published: November 22, 2014 11:00 PM