शुक्रवारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती गडचिरोलीच्या वतीने एकस्तर पदोन्नती वेतनश्रेणी लाभ मिळणे, अतिरिक्त प्रदान रक्कम वसुली थांबविण्यात यावी याकरिता निवेदन देऊन चर्चा केली. संपूर्ण गडचिरोली जिल्हा आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त आहे. या क्षेत्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार एकस्तर पदोन्नती वेतनश्रेणीचा लाभ मिळावयास हवा; परंतु ज्या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली आहे, त्या कर्मचाऱ्यांचा एकस्तरचा लाभ कमी करून वरिष्ठ वेतनश्रेणीप्रमाणे लाभ देण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी परिपत्रक काढलेले आहे. तसेच यासंबंधाने यापूर्वी शासनाकडे मार्गदर्शनसुद्धा मागवले आहे. शासनाकडून अद्यापही मार्गदर्शन अप्राप्त असताना एकस्तर अतिप्रदानच्या नावाखाली वसुली प्रस्तावित केली आहे.
एकस्तर बंद करून वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ देणे सुरू करण्यात आल्याने बहुतांश शिक्षकांचे वेतन कमी होत आहे. अनेक शिक्षकांकडून अतिप्रदान रकमेची वसुली होणार असल्याने आपण या प्रकरणात लक्ष घालून शासनस्तरावर पाठपुरावा करावा, तसेच जिल्हा परिषद प्रशासनकडून न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती केली.
एकस्तर वेतनश्रेणीबाबत सर्व बाबी लक्षात येताच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी प्रतिकूल परिस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील कर्मचारी उत्तम कार्य करीत असताना त्यांना लाभाचे वेतन मिळावयास हवे आणि त्याकरिता मी सदैव कर्मचाऱ्यांसोबत आहे. याकरिता मी स्वतः शासनस्तरावर पाठपुरावा करून एकस्तर पदोन्नती वेतनश्रेणी लाभ मिळवून देण्यास व अतिप्रदान रकमेची वसुली थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले, तसेच या संदर्भात मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याशीसुद्धा चर्चा करून त्यांच्या सहकार्याने शासन स्तरावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, कृषी सभापती प्रा. रमेश बारसागडे, जिल्हा परिषद सदस्य संपत आळे उपस्थित हाेते. निवेदन देतेवेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार, प्रसिद्धीप्रमुख गुलाब मने उपस्थित हाेते.