संजय तिपाले
गडचिरोली : राज्याच्या शेवटच्या टोकावरील गडचिरोली - चिमूर या तीन जिल्ह्यांत विखुरलेल्या लोकसभा मतदारसंघात यावेळी भाजप व काँग्रेसमध्ये काट्याची लढत होत आहे. सलग दोनवेळा भाजपकडून दिल्ली गाठणाऱ्या अशोक नेते यांना यंदा हॅटट्रिकची संधी आहे, तर काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवत आहेत. बलाढ्य भाजपपुढे लढताना काँग्रेसच्या विजयाचे धनुष्यबाण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना पेलवते का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
आदिवासी-ओबीसीबहुल, माओवादग्रस्त व तेलंगणा, छत्तीसगड सीमेला चिकटून असलेल्या गडचिरोली - चिमूर मतदारसंघात गडचिरोलीतील अहेरी, आरमोरी तसेच गाेंदियातील आमगाव व चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी व चिमूर अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. सलग दोन टर्म खासदार, त्याआधी दोन टर्म आमदार यामुळे अशोक नेते यांचा मतदारांशी संपर्क आहे. तसेच अनुभव देखील गाठीशी आहे, पण त्यांना ‘अँटी इन्कम्बन्सी’चा सामना करावा लागत आहे.
काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान हे नवखे उमेदवार आहेत. भाजपच्या तुलनेत बूथ पातळीवरील यंत्रणेचा अभाव आहे. निवडणुकीपूर्वीच पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर येऊन त्यातून दोन नेत्यांचे बंड झाले ते रोखण्यात यश आलेले नाही.
मातब्बरांची प्रतिष्ठा लागली पणालागडचिरोलीचे पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे, तर अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचे हे होमपीच आहे, त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा पणाला लावली आहे. उमेदवारीवरुन प्रतिभा धानोरकरांशी विसंवाद झाल्याने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूरऐवजी गडचिरोली- चिमूरमध्ये जादा लक्ष घातले आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
चामोर्शी तालुक्यात उद्योगासाठीच्या भू - संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध आहे. लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे शेतकरी संतप्त आहेत. भाजपला याचा फटका बसेल, काँग्रेस हा मुद्दा कसा कॅश करतो, हे पहावे लागेल.बेरोजगारी, उच्चशिक्षणाच्या अपुऱ्या सोयी, पायाभूत सुविधांचा अभाव, रेल्वे, रखडलेले रस्ते, पूल बांधकाम व दळणवळणासाठीची परवड हे प्रश्नही ऐरणीवर आहेत. पेसा कायद्याची अमलबजावणी व ओबीसी जनगणना होत नसल्याने नाराजी आहे.
गटा - तटाचा काय होणार परिणाम ?nभाजप व काँग्रेस या दोन पक्षांसह मित्रपक्षांमध्येही बेबनाव आहे . भाजपने सर्व पदाधिकाऱ्यांची मोट बांधली. नाराज असलेले माजी राज्यमंत्री अंबरिशराव आत्राम यांचेही मन वळविले. nमित्रपक्ष राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) मंत्री धर्मरावबाबा आत्राम हे सोबत आहेत. मात्र, काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत मतभेद आहेत. इंडिया आघाडी व महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने फारकत घेतल्याने अडचणी वाढल्या आहेत.
२०१९ मध्ये काय घडले?अशोक नेते भाजप (विजयी) ५,१९,९६८ डॉ. नामदेव उसेंडी काँग्रेस ४,४२,४४२डॉ. रमेश गजबे वंचित बहुजन आघाडी १,११,४६८