आरमोरी शहरातून काळागोटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. लहान-मोठ्या खड्ड्यांमुळे रस्त्याची पुरती वाट लागली आहे. ताडुरवार नगरातील नरेंद्र निंबेकर यांच्या घरासमोर पडलेल्या मोठ-मोठ्या खड्ड्यांत दरवर्षी पावसाळ्यात पाणी साचून राहते. रस्त्यावर चिखलमिश्रीत पाणी असते. साचलेल्या चिखलयुक्त पाण्यातून नागरिकांना ये-जा करावी लागते. या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी अनेकदा नागरिकांनी नगरपरिषद प्रशासनाला निवेदन दिले. मात्र, याकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही. खड्ड्यांमुळे रस्त्यालगत घर असलेल्या नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे काळा गोटाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरूस्ती केव्हा हाेणार? याची नागरिकांना प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे, नागरिकांनी अनेकदा प्रशासनाला याबाबत कळविले तरीही दखल घेण्यात आलेली नाही. पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावर साचणाऱ्या पाण्यामुळे वाहनधारकांची दिशाभूल हाेत आहे. या ठिकाणी एखादा अपघात झाल्यानंतरच नगरपरिषद प्रशासन रस्त्याची दुरुस्ती करणार काय?
देविदास काळबांधे, आरमोरी