गडचिरोली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची काँग्रेसकडून चाचपणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर २ व ३ जून रोजी राज्यभरातील इच्छुकांशी पक्षश्रेष्ठी संवाद साधणार आहेत. दरम्यान, गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील इच्छुकांना मुंबईचे बोलावणे आले असून २ जून रोजी दुपारी चार ते साडेचार वाजेची वेळ दिली आहे. सलग दोनवेळा अशोक नेतेंकडून पराभवाचा सामना करावा लागलेले माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांना पक्ष तिसऱ्यांदा उमेदवारी देईल का, याची उत्सुकता आहे.
एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात दहा वर्षांपासून भाजपचे वर्चस्व आहे. गडचिरोलीसह आरमोरी, अहेरी, चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी व चिमूर तसेच गोंदियातील आमगाव अशाप्रकारे तीन जिल्ह्यांतील सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश असलेला गडचेराली-चिमूर हा भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण मतदारसंघ आहे. २०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे अशोक नेते व काँग्रेसचे डॉ. नामदेव उसेंडी यांच्यात लढत झाली. दोन्ही वेळा नेतेंचा विजय झाला. मात्र, २०१९ मध्ये नेते यांचे मताधिक्य कमी करण्यात डॉ. उसेंडींना यश आले. आता आगामी लोकसभेसाठी काँग्रेसने इच्छुकांची चाचपणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून २ व ३ जून रोजी प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या उपस्थितीत राज्यातील दिग्गज नेते मुंबईमध्ये दादर येथील टिळक भवनात इच्छुकांशी संवाद साधून आढावा घेणार आहेत.
चार डॉक्टरांमध्ये चुरस, कोणाला लागणार लॉटरी ?
लोकसभेसाठी माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. नामदेव किरसान, डॉ. नितीन कोडवते व डॉ. चंदा कोडवते हे चौघे जण काँग्रेसकडून दावेदार आहेत. नामदेव उसेंडी व कोडवते दाम्पत्य हे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत, तर नामदेव किरसान हे स्वेच्छानिृवत्ती घेऊन राजकारणात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागात उच्चपदावर असलेल्या किरसान यांच्याकडे वकिलीची पदवी असून अर्थशास्त्रातून पीएच.डी. मिळवलेली आहे. २००९ पासून ते उमेदवारीसाठी प्रयत्न करत आहेत. पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. संधी मिळाली तर 'राज्य'शास्त्र जमेल का, हे पाहावे लागेल. नामदेव उसेंडींचा दोन वेळा पराभव झालेला आहे, तर डॉ. चंदा कोडवते यांना विधानसभेला हार पत्करावी लागली होती. डॉ. नितीन कोडवते यांनाही अद्याप नशीब अजमावण्याची संधी मिळालेली नाही.
गडचिरोली-चिमूर मतदारसंघासाठी काँग्रेसची जोरदार तयारी सुरू आहे. २ जूनला मुंबईत पक्षश्रेष्ठी आढावा घेणार आहे. पक्षश्रेष्ठी देतील त्या उमेदवारामागे पूर्ण ताकदीने उभे राहून विजय खेचून आणण्यासाठी प्रयत्नशील राहू.
- महेंद्र बाम्हणवाडे, जिल्हाध्यक्ष काँग्रेस, गडचिरोली