गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पासाठी लॉयड्स मेटल्स कंपनीकडून शासनाकडे वाढीव लीज मागण्यात आली. याकरिता २७ ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरणविषयक जनसुनावणी ठेवली आहे. यात सुरजागड पहाडी परिसराच्या प्रभावित १३ गावांतील ग्रामस्थांना पर्यावरणाबद्दल आपली मते मांडायची आहेत. परंतु, प्रकल्पासाठी आपले गाव उठेल, अशी शंका लोकांच्या मनात आहे. याच भीतीने सोमवारी एटापल्ली तालुक्याच्या सुरजागड पहाडी परिसरातील काही ग्रामस्थांनी गडचिरोली गाठून थेट जिल्हाधिकारी संजय मीणा यांना 'साहेब, आमची गावे उठणार का?' असा प्रश्न विचारला.
एटापल्ली तालुक्याच्या सुरजागड लोह प्रकल्पासाठी लॉयड मेटल्स कंपनीने शासनाकडे वाढीव लीज मागितल्याने प्रकल्पाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. यासाठी पुन्हा अधिकच्या भागात उत्खननाचे काम होऊ शकते. त्यामुळे आमचीही गावे उठणार का? असे झाल्यास आम्ही कुठे जाणार? आमची शेती, घराचे काय होईल? असे प्रश्न ग्रामस्थांच्या मनात घोळत आहेत. त्यामुळे गोंधळलेल्या ग्रामस्थांनी गडचिरोली गाठून जिल्हाधिकारी संजय मीणा यांना गावे उठविली जाणार का? असे प्रश्न केले.
जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मनातील शंका व भीती दूर करत कोणालाही उठवले जाणार नाही, कोणतेही नुकसान होणार नाही, असे स्पष्ट केले. येत्या २७ ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे पर्यावरणाबाबतची जनसुनावणी आहे. बाधित सर्व गावकऱ्यांनी जनसुनावणीत येऊन आपले म्हणणे मांडावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना सांगितले.
अफवांवर विश्वास ठेवू नका
सुरजागड भागातील एकही गाव उठणार नाही. गावे उठणार, असे तुम्हाला कुणी सांगितले. याबाबत तुमच्याकडे शासनाचे पत्र आहे का? असा प्रतिप्रश्न जिल्हाधिकाऱ्यांनी केला. गाव उठविण्याचा प्रश्नच येत नाही. जो कुणी तुम्हाला गाव उठणार, असे सांगत असेल त्यांना त्याबाबत कोणता आधार आहे हे विचारा. तुम्ही निश्चित राहा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वस्त केले.