लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यातून पहिले कॅबिनेट मंत्री होण्याचा इतिहास रचणारे ज्येष्ठ नेते धर्मरावबाबा आत्राम हे यावेळी पाचव्यांदा निवडून आले आहेत. यापूर्वी ते ज्या-ज्यावेळी विधानसभेत गेले, त्या-त्यावेळी त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली. अडीच वर्षांपूर्वी सत्ताबदलात त्यांना थेट कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. यावेळी देखील महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याने धर्मरावबाबा व मंत्रिपद हे समीकरण कायम राहील का, याची जिल्हावासीयांना उत्सुकता आहे.
यापूर्वी कारकीर्दीत तीनवेळा विधानसभा गाठण्याचा विक्रम माजी खासदार मारोतराव कोवासे यांनी केला होता. ते १९८०, १९९० व १९९५ मध्ये गडचिरोली क्षेत्रातून आमदार झाले होते. त्यांना एकवेळा राज्यमंत्रिपदाची लॉटरीही लागली होती. दरम्यान, गेल्यावेळी चौथ्यांदा आमदार होऊन धर्मरावबाबा यांनी कोवासे यांचा राजकीय वाटचालीत तीनवेळा आमदार होण्याचा विक्रम मोडीत काढला होता. यावेळी देखील धर्मरावबाबा यांनी निर्विवाद यश मिळविले. त्यामुळे जिल्ह्याच्या इतिहासात पाचवेळा आमदार होणारे ते एकमेव आमदार आहेत. याआधी चारवेळा ते जेव्हा आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले, तेव्हा त्यांच्या मंत्रिपदाचा राजयोग जुळून आला होता.
तीनवेळा राज्यमंत्रिपद भूषविणाऱ्या धर्मरावबाबा यांच्या रूपाने पहिल्यांदाच अन्न व औषध प्रशासन खात्याचे कॅबिनेट मंत्रिपद मिळाले. यावेळी निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाचा कस लागला होता. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादीकडून (शरद पवार गट) स्वतःचीच कन्या भाग्यश्री आत्राम (हलगेकर) तर महायुतीधर्म नाकारून पुतणे अम्ब्रीशराव यांनी अपक्ष मैदानात उतरून त्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला, पण यातून मार्ग काढत धर्मरावबाबा यांनी आपली घोडदौड कायम ठेवली. महायुतीच्या सरकारमध्ये त्यांची वर्णी लागणार का, याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
पुन्हा संधीची अपेक्षा दरम्यान, धर्मरावबाबा ज्या अहेरी क्षेत्राचे नेतृत्व करतात तेथे नक्षलवादासारखी समस्या आहे. आदिवासीबहुल, दुर्गम, अतिदुर्गम पाडे, वाड्या असलेल्या या भागाचा कायापालट व्हावा, दैन्य-दारिद्र्य हटावे व लोकांचे जीवनमान उंचावणे गरजेचे आहे. आदिवासींचे नेते म्हणून धर्मरावबाबा यांना पुन्हा मंत्रिपद मिळावे, अशी समर्थकांना अपेक्षा आहे. याकरीता जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, रायुकाँ जिल्हाध्यक्ष लिलाधर भरडकर, नागेश मडावी, प्राचार्य रतन दुर्गे, सांबय्या हिचामी, मधुकर कोल्लुरी, रमेश मागनोवार, उद्धीट बिस्वास, मनीष दुर्गे, कमल तोरेम, पुष्पा अलोणे, बालाजी गावंडे, इंदरशा मडावी, गणी शेख, रवी गडीमेटला, श्रीनिवास कावडे, विनोद आलाम, राजाराम आत्राम, रमेश मडावी यांनी अजित पवार यांना साकडे घातले आहे.
धर्मरावबाबा यांचा हार-जीतचा प्रवास वर्ष विजयी / पराभूत १९९० विजयी १९९५ पराभूत १९९९ विजयी २००४ विजयी २००९ पराभूत २०१४ पराभूत २०१९ विजयी २०२४ विजयी