लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील ९ नगर पंचायतींना सार्वत्रिक निवडणुकीचे वेध लागले आहेत. नोव्हेंबर अखेरपर्यंत सर्व नगर पंचायतींचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेसोबतच राजकीय पक्षही निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. ही निवडणूक राज्यात सत्तेत असलेल्या महाआघाडीतील ३ प्रमुख घटक पक्ष एकत्रितपणे लढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात सत्तारूढ होताना एकत्रित आलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही एकत्रितपणे लढाव्यात यासाठी जिल्हास्तरावर या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचे सूर जुळवण्याचे प्रयत्न काही दिवसांपासून सुरू आहेत. गेल्या पाच महिन्यात महाआघाडीमधील तीनही पक्षांच्या नेते व पदाधिकाऱ्यांच्या एकत्रितपणे तीन बैठका झाल्या आहेत. त्यात सर्वानी सकारात्मक प्रतिसादही दिला आहे. मात्र कोणाला किती जागा द्यायच्या किंवा कोणत्या नगर पंचायतीत कोणाला झुकते माप द्यायचे याबाबतचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे या मुद्यावरून ताणाताणी होण्याची शक्यता आहे.लोकसभा मतदार संघावर ६ वर्षांपासून भाजपचे वर्चस्व आहे. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तीनपैकी अहेरी मतदार संघाची एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपकडून बळकावली. तरीही गडचिरोली आणि आरमोरी या मतदार संघांमध्ये सलग दुसऱ्यांदा भाजपला कौल मिळाला आहे. त्यामुळे भाजपचे हे वर्चस्व कमी करायचे असेल तर एकत्रितपणे लढण्याशिवाय पर्याय नाही, या भूमिकेला महाविकास आघाडीतील पक्षांचे स्थानिक पदाधिकारी तयार झाले आहेत.दक्षिण गडचिरोली भागात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असल्यामुळे या भागातील नगर पंचायतींमधील जास्तीत जास्त जागांवर राष्ट्रवादी दावा करण्याची शक्यता आहे. मात्र त्याचवेळी सध्या काँग्रेससोबत असलेल्या आदिवासी विद्यार्थी संघाकडूनही काही ठिकाणच्या जागांसाठी आग्रह धरला जाऊ शकतो. धानोरा, चामोर्शी, मुलचेरा या नगर पंचायतींच्या जागांसाठी काँग्रेस आग्रही राहू शकते. तर कुरखेडा, कोरची भागावर शिवसेनेचा दावा राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप नगर पंचायत अध्यक्षपदाची सोडत निघालेली नाही. ती निघाल्यानंतर राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग येईल.
गटबाजी ठरणार डोकेदुखीजिल्ह्यात काँग्रेस आणि शिवसेनेत अनेक वर्षांपासून गटबाजी आहे. काँग्रेसमधील गटबाजी दूर करण्यासाठी ज्येष्ठ नेते ना.विजय वडेट्टीवार यांनी पुढाकार घेत सर्वांना सोबत घेण्याचे धोरण अवलंबिले. त्यामुळे काँग्रेसमध्ये अलिकडे बऱ्याच प्रमाणात समन्वयाचे वातावरण दिसून येते. पण शिवसेनेतील गटबाजी अद्याप कायम आहे. कोणीही कोणाचे वर्चस्व स्वीकारायला तयार नाही. त्यामुळे नगर पंचायत निवडणुकीत याचा फटका सेनेला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.विधान परिषदेतून येणार अंदाजविधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचे वारे सध्या गरम आहे. भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असा थेट मुकाबला असल्यामुळे ही निवडणूक नगर पंचायतींच्या प्रस्तावित निवडणुकांचा कल कुणाकडे झुकू शकतो याची झलक दाखविणारी ठरणार आहे.