कौसर खान, सिरोंचा: अतिदुर्गम आसरअल्ली वनपरिक्षेत्रात (ता.सिरोंचा) एकाचवेळी १९ फर्निचर दुकानांवर धाडी टाकून वनविभागाने झाडाझडती घेतली. यावेळी तब्बल ९ दुकानांमध्ये वनपरिक्षेत्रातील दुर्मिळ व मौल्यवान सागवान आढळून आले. सुमारे साडेसात लाखांचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आला. धक्कादायक म्हणजे क्षेत्रसहाय्यकाच्या संगनमतानेच हा गोरखधंदा सुरु असल्याची धक्कादायक माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे.
आसरअल्ली परिक्षेत्रातील आसरअल्ली, जंगलपल्ली, अंकिसा कंबलपेठा या गावांत १९ फर्निचर दुकाने आहेत. वनविभागातील वनकर्मचाऱ्यांची पथके तयार करुन २३ रोजी एकाचवेळी छापे टाकण्यात आले. तेथील ८ दुकानांमध्ये दुर्मिळ सागवान लाकडे व फर्निचर तयार करण्यासाठी कापून ठेवलेल्या फळ्या असा लाखोंचा मुद्देमाल आढळून आला. हा मुद्देमाल आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील असल्याचे स्पष्ट झाल्यावर दुकानदारांची कसून चौकशी केली. यात क्षेत्रसहाय्यक कादीर शेख याच्या आशीर्वादानेच जंगलातून सागवान कापून रातोरात विल्हेवाट लावली जात असल्याचे उघड झाले. त्यामुळेक्षेत्र सहायक कादीर शेखला तडकाफडकी निलंबित करण्यात आले. उपवनसंरक्षक पूनम पाटे यांच्याम मार्गदर्शनाखाली उपविभागीय वनाधिकारी पी.डी.बुधनवर, वनपरिक्षेत्र अधिकारी पी.बी.झाडे यांनी ही कारवाई केली. कारवाईत ५० वनाधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
यांच्यावर झाली कारवाई
रवींद्र मीनाबाबू कासोजी , संतोष साबय्या गोत्तरी, समय्या पोचालू गंप्पा, राजकुमार समय्या पोटे (सर्व रा.आसरअल्ली), देवेंद्र लच्चन्ना गोत्तुरी ,किशोर शंकर कोरटला, राजेंद्र अंकन्ना गोत्तुरी (तिघे रा. रा.जंगलपल्ली), सुरेश चंद्रय्या अरिंदा (रा.अंकिसा) यांच्यावर भारतीय वन अधिनियम १९२७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. त्यांच्याकडून एकूण सात लाख ५१ हजार ५९४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. बेवारस ३४ हजार ३११ रुपयांचे सागवान देखील आढळले. एकूण सात लाख ८५ हजार ९०५ रुपयांचा हा सर्व मुद्देमाल वनविभागाने ताब्यात घेतला आहे.परवाने कायमस्वरुपी रद्द
फर्निचर मार्टमध्ये आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील दुर्मिळ सागवान आढळून आले. या सर्व दुकानदारांचा फर्निचरमार्टचा परवाना २३ जून रोजीपासून कायमस्वरुपी रद्द केल्याची माहिती उपवनसंरक्षक पूनम पाटे यांनी दिली. दरम्यान, आतापर्यंतची ही मोठी कारवाई मानली जात आहे.