- दिलीप दहेलकरगडचिराेली - लोकसभा निवडणुकीच्या काळात राजकीय पक्ष, उमेदवारांना प्रचार, प्रसारासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची आवश्यकता भासते. निवडणूक आयोगाने उमेदवारांना खर्चाची मर्यादाही ठरवून दिली. आता आयोग थेट निवडणूक कालावधीतील मोठ्या रकमेच्या व्यवहारांवर करडी नजर ठेवत आहे. त्यामुळे सर्वांनाच बँकेतून पैसे काढताना काळजी घ्यावी लागणार आहे. निवडणूक काळात बँकेतून दहा लाखांपेक्षा अधिक रक्कम काढल्यास चाैकशी होणार आहे.दहा लाखांपेक्षा जादा रक्कम बँकेतून कुणी काढली, तर बँकांना त्याची माहिती तत्काळ आयकर विभागाला द्यावी लागणार आहे. मोठी रक्कम काढून त्याचा व्यवस्थित हिशेब देऊ न शकल्यास कारवाईची टांगती तलवार राहणार आहे. बँकांमधून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढल्यास चौकशी करण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून संशयास्पद व्यवहारावर पूर्ण नजर आहे.
अवैध रक्कम आयकर विभागाकडे जाणारविविध पथकांनी जप्त केलेली रोख रक्कम सोडण्यासाठी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कॅश रिलीज समिती स्थापन करण्यात आली आहे.पकडलेली रक्कम वैध दस्तऐवजांची पाहणी करून लगेच सोडण्यात येणार आहे. मात्र, अवैध रक्कम आयकर विभागाकडे जमा होणार आहे.बँकांच्या प्रशासनाने दहा लाखांपेक्षा अधिक व्यवहारांची माहिती प्रशासनाला देण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
‘एटीएम’वरही आहे वॉच- निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून कोणत्याही वेळी तपासणी होण्याची शक्यता आहे. - एटीएममध्ये रोकड भरणाऱ्या कॅशव्हॅन आणि सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती बँकांना कॅशव्हॅनमध्येच ठेवावी लागेल. तसेच एटीएममध्ये भरण्यात येणाऱ्या रकमेची माहितीही सोबत ठेवावी लागेल.
काय म्हणतो नियम? - आरटीईजीद्वारे एका बँक खात्यातून दुसऱ्या खात्यात दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम वळती झाल्यास, त्याची माहिती तत्काळ द्यावी लागणार आहे.-उमेदवार वा त्याची पत्नी किंवा त्याच्यावर अवलंबून असलेल्या व्यक्तीच्या खात्यातून एक लाखापेक्षा जास्त रक्कम खर्च झाली किंवा जमा झाल्यास त्याचीही माहिती द्यावी लागेल.