लाेकमत न्यूज नेटवर्क•एटापल्ली : तालुक्यात २०१९ मध्ये प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत काेट्यवधी रुपये खर्च करून अनेक गावांना जोडणारे रस्ते निर्माण करण्यात आले. सदर रस्त्यांचा देखभाल दुरुस्तीचा कालावधी ५ वर्षांचा आहे; परंतु एका वर्षातच डांबरी रस्त्याची दुरवस्था हाेऊन गिट्टी बाहेर पडली. त्यामुळे रस्ता बांधकामात याेग्य दर्जा राखण्यात आला काय, असा सवाल करीत बांधकामाची चाैकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २०१९ मध्ये ८७ लाख रुपये खर्च करून तोडसा फाटा ते आलेंगापर्यंत ३ कि.मी. रस्त्याच्या दर्जाेन्नतीचे काम करण्यात आले. माहिती फलकात काम पूर्ण झाल्याचा दिनांक २४ मे २०१९ हा आहे. रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचा अवधी २४ मे २०२४ पर्यंत आहे. हा कालावधी ५ वर्षांचा असला तरी अडीच वर्षांतच अर्ध्या रस्त्याचे डाबरीकरण पूर्णंत: उखडले. सध्या बारीक चुरी वर निघाली आहे. ताेडसा-आलेंगा मार्गासह तालुक्यातील इतरही रस्त्यांची लवकर दुरुस्ती करावी, तसेच रस्त्यांचा दर्जा तपासून चाैकशी करावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी शासन व प्रशासनाकडे केली आहे.
या मार्गावरील अपघातास जबाबदार काेण?काही दिवसांपूर्वी एका कारचे टायर फुटून ती झाडाला आदळली. माेठा अपघात झाला; परंतु सुदैवाने जीवितहानी झाली नाही. दुरुस्तीसाठी विशिष्ट कालावधी असतानाही रस्त्याची दुरुस्ती केली जात नाही. परिणामी अपघात हाेतात. याला जबाबदार काेण, असा सवाल नागरिकांनी केला आहे. प्रधानमंत्री व मुख्यमंत्री अशा दाेन्ही सडक याेजना असल्या तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी नाही.