आरमोरीतील प्रकार : कोट्यवधी रूपये खर्च करून उभारलेली बसस्थानकाची इमारत निरूपयोगी विलास चिलबुले । लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : प्रवाशांची अडचण लक्षात घेऊन आरमोरी येथे राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने कोट्यवधी रूपये खर्च करून बसस्थानकाची प्रशस्त इमारत बांधण्यात आली. मात्र सदर बसस्थानक मुख्य मार्गाच्या पलिकडे असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या येथे जात नाही. त्यामुळे अनेक प्रवाशी रस्त्यावर उन्हात उभे राहून बसची प्रतीक्षा करीत असतात. अनेक बसचालकही बसस्थानकात बस न नेता रस्त्यावरच उभी करून प्रवाशी आतमध्ये घेतात. सदर प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून आरमोरी शहरात सुरू आहे. मात्र या गंभीर प्रकाराकडे राज्य परिवहन महामंडळासह प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी कोट्यवधी रूपये खर्च करून बांधण्यात आलेली बसस्थानकाची इमारत निरूपयोगी ठरली आहे.आरमोरी येथील मुख्य मार्गावर जुना प्रवाशी निवारा आहे. येथे बाजारपेठ असल्याने नागरिक व प्रवाशांची मोठी गर्दी असते. परिणामी या ठिकाणी वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न निर्माण झाला. सदर प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी आरमोरी येथे जवळपास १० ते १५ वर्षांपूर्वी नव्या बसस्थानकाचे काम मंजूर करण्यात आले. कोट्यवधी रूपये खर्च करून बर्डी परिसरात बसस्थानकाची प्रशस्त इमारत उभारण्यात आली. सदर बसस्थानकात साधारण बसगाड्या जातात व येथून या बसगाड्यांमध्ये प्रवाशी घेतले जातात. मात्र गडचिरोली-नागपूर, गडचिरोली-ब्रह्मपुरी, गडचिरोली-आरमोरी-साकोली-भंडारा आदीसह अनेक लांब पल्ल्याच्या बसगाड्या नव्या बसस्थानकात जात नाही. मुख्य मार्गावरच बसेस थांबवून प्रवाशी आतमध्ये घेतले जातात. काही मोजक्याच साधारण बसगाड्या नव्या बसस्थानकात थांबत असतात. तर लांब पल्ल्याच्या बसगाड्या या बसस्थानकात प्रवाशी घेण्यासाठी नेल्या जात नाही. त्यामुळे सदर नवे बसस्थानक प्रवाशी व बसगाड्यांअभावी ओस पडल्याचे दिसून येते. अनेक प्रवाशी बसचालकाला बसगाडी नव्या बसस्थानकात का नेत नाही, अशी विचारणा करतात. मात्र बसचालक प्रवाशांना उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याचे अनेक प्रवाशांनी लोकमतशी बोलताना सांगितले. सध्या उष्णतामान प्रचंड वाढले असून तापमानाचा पारा ४३ अंशावर पोहोचला आहे. अशास्थितीतही बसमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी बर्डी परिसरात रस्त्याच्या कडेला उन्हात उभे राहून अनेक प्रवाशी बसची प्रतीक्षा करीत असतात. मुख्य मार्गावर बस थांबत असल्याने वाहतुकीस अडथळाआरमोरी शहराची लोकसंख्या आता दुपटीने वाढली आहे. शिवाय आरमोरी शहरात शाळा व महाविद्यालयांची संख्या वाढली असून ग्रामीण भागातून दररोज शेकडो विद्यार्थी आरमोरी शहरात ये-जा करतात. याशिवाय खासगी वाहनांची संख्याही प्रचंड वाढली आहे. मात्र महामंडळाच्या लांब पल्ल्याच्या बसगाड्या आरमोरी येथील नव्या बसस्थानकात जात नसून रस्त्यावरूनच प्रवाशी घेतले जातात. बस मुख्य मार्गावर थांबत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. आपण स्वत: रस्त्यावर उभे राहून बसेस बसस्थानकामध्ये नेण्यासंदर्भात चालक, वाहकांना सूचना केल्या आहेत. मात्र याकडे बस चालकांचे दुर्लक्ष होत आहे.- एस. डी. मोरे, वाहतूक नियंत्रक, बसस्थानक आरमोरी
बसस्थानक आत, बसेस रस्त्यावर अन् प्रवासी उन्हात
By admin | Published: May 25, 2017 12:38 AM