धानोरा : नदीनाल्यांतील संपूर्ण पाणी वाहून जाऊ नये. अधिकाधिक पाणी साचून राहून जमिनीत मुरावे, यासाठी धानोरा तालुक्यातील करेमर्का येथील नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे ब्रिज-कम-बंधाऱ्याचे बांधकाम करण्यात आले. परंतु, सहा महिन्यांच्या आतच बंधाऱ्याला भगदाड पडून सर्व पाणी वाहून गेले. त्यामुळे येथील नागरिकांनी बंधाऱ्याच्या बांधकामाबद्दल पश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या बंधाऱ्याची पक्की दुरुस्ती लवकर करावी, अशी मागणीही गावकऱ्यांनी केली आहे.
धानाेरा तालुक्यातील सालेभट्टी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या करेमर्का गावालगत नदी आहे. पावसाळ्यात गावातील नागरिकांना नदी पोहून जावे लागत होते. त्याशिवाय, दुसरा रस्ताच नाही. येथे जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. पावसाळ्यात विद्यार्थ्यांची माेठी अडचण हाेत हाेती. नागरिकांच्या सततच्या मागणीमुळे या नदीवर नाबार्ड योजनेंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक २ व सार्वजनिक बांधकाम उपविभाग धानोराअंतर्गत काेट्यवधी रुपये खर्च करून पुलाचे बांधकाम करण्यात आले. पूल बांधकामासोबतच पावसाचे पाणी वाहून जाऊ नये. पाणी साचून राहावे, यासाठी ब्रिज-कम-बंधारा बांधण्यात आला. गडचिरोली जिल्ह्यातील हा पहिलाच ब्रिज-कम-बंधारा आहे. ४ सप्टेंबर २०२० रोजी पूल व बंधाऱ्याचे उद्घाटन पार पडले. पुलाला जोडूनच पाच मीटरचे १२ आर्चटाइप गाळे बांधण्यात आले. त्याची उंची दोन पॉइंट ४० मीटर ठेवण्यात आली. यामुळे येथे पावसाचे पाणी साचून त्याचा उपयोग ढवळी, करेमर्का, जपतलाई, वडगाव गावातील नदीकाठालगतच्या शेतीला व पशुपक्ष्यांना हाेणार, अशी याेजना हाेती. सुरुवातीला दोन ते तीन किमीपर्यंत पाणी अडवून त्याचा उपयोग शेतीसह विहिरीतील पाण्याची पातळी वाढण्यास झाला. हा उद्देश समाेर ठेवून जिल्ह्यात अशा प्रकारचा पहिलाच बंधारा पुलाला जाेडून बांधण्यात आला. परंतु, उद्घाटन होऊन सहा महिने उलटले नाही तर बंधाऱ्याला भगदाड पडले. येथील संपूर्ण पाणी वाहून गेले आहे. ज्या उद्देशाने बंधारा बांधण्यात आला, तो हेतूच असफल झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करेमर्का येथील बाबुराव तुलावी, गणपत नरोटे, मनकू तुलावी, गणपत कोरेटी, रवींद्र नरोटे, मन्साराम कोल्हे, नाजुकराव मडावी, महागू मडावी, मोहन उसेंडी, धनीराम तुलावी, शंकर तुलावी, मानकू कुमोटी, घिसू कुमोटी, विकास तुलावी व परिसरातील नागरिकांनी केली आहे.
बाॅक्स
उन्हाळ्यापूर्वीच बंधारा काेरडा
नदी-नाल्यातील संपूर्ण पाणी वाहून जाऊ नये, यासाठी ब्रिज-कम-बंधारा ही संकल्पना अस्तित्त्वात आली. यानुसार धानाेरा तालुक्यातील करेमर्का गावालगतच्या नदीवर पूल बांधकामासह अर्धवर्तुळाकार पद्धतीने १२ आर्चटाइप गाळे बांधण्यात आले. परंतु याेग्य प्रकारे बांधकाम न झाल्याने पहिल्याच पावसात बंधाऱ्याला भगदाड पडले. त्यामुळे ज्या उद्देशाने बंधारा बांधण्यात आला, त्याच उद्देशाला हरताळ फासला गेला. तीव्र उन्हाळा सुरू हाेण्यापूर्वीच बंधाऱ्यातील नदीपात्र काेरडे पडले आहे.