दिरंगाई वाढली : वेतन अदा करण्यात अडचणी गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात एकूण २ लाख ७२ हजार ७२० नोंदणीकृत मजूर आहेत. यापैकी रोहयो कामात सक्रीय असलेल्या २ लाख ६१ हजार ७५९ मजुरांकडे आधारकार्ड असून त्यांनी आपले बँक खाते आधारकार्डशी संलग्नीत केले आहे. मात्र अद्यापही गडचिरोली जिल्ह्यातील १० हजार ९६१ मजुरांकडे आधारकार्ड नसून त्यांनी आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड क्रमांक जोडले नाही. परिणामी आॅनलाईन वेतन अदा करण्यात प्रशासनाला प्रचंड अडचणी येत आहेत. रोजगार हमी योजनेच्या विभागाकडे कामाची मागणी करून दरवर्षी जिल्ह्यातील हजारो मजूर नोंदणी करतात. मात्र आधार कार्ड क्रमांकाशी आपले बँक खाते संलग्नीत करीत नाही. त्यामुळे वेतन अदा करण्याची प्रक्रिया अतिशय मंदावली होती. सदर प्रकार लक्षात आल्यावर जिल्हाधिकारी व जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार जि.प.च्या नरेगा विभागाने गतवर्षी शिबिर लावून मजुरांना आधार कार्ड काढण्यासाठी नोंदणी केंद्राची व्यवस्था केली होती. मात्र सक्रीय असलेल्या अनेक मजुरांनी अद्यापही आधार कार्ड काढले नाही. यामध्ये अहेरी तालुक्यातील ४७६, आरमोरी तालुक्यातील ९२०, भामरागड तालुक्यातील १ हजार २५६, चामोर्शी तालुक्यातील ३ हजार १३, देसाईगंज तालुक्यात एक, धानोरा ३७९, एटापल्ली १ हजार ३१७, गडचिरोली ७१८, कोरची ९१४, कुरखेडा ३६०, मुलचेरा ३२ व सिरोंचा तालुक्यात १ हजार ५७५ रोहयो मजुरांकडे अद्यापही आधार कार्ड नाहीत. परिणामी या मजुरांनी आपले आधार कार्ड क्रमांक बँक खात्याशी संलग्नीत केले नाही. आधार कार्ड काढण्याच्या मोहिमेदरम्यान आतापर्यंत रोहयो मजुरांच्या आधार कार्ड काढण्याची जिल्ह्याची टक्केवारी ९५.९८ आहे इतक्याच रोहयो मजुरांनी आतापर्यंत बचत बँक खात्याशी आधार कार्ड क्रमांक संलग्नीत केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
१० हजारांवर रोहयो मजूर आधारकार्डविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2017 1:28 AM