गडचिराेली : अश्लील शब्दात शिवीगाळ करून तसेच चारित्र्यावर संशय घेऊन आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आराेपी महिलेस गडचिराेली पाेलिसांनी अजूनही अटक केली नाही. ४ मार्चला गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पाेलिसांनी आराेपीला अटक केली नाही. तातडीने अटक करावी, अशी मागणी पीडित पेंदाम कुटुंबीयांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केली.
उषा सुनील पेंदाम असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून ती गडचिराेली शहराच्या लांझेडा येथील रहिवासी हाेती. मृत उषा हिची सासू ताराबाई पाेलाजी पेंदाम व पती सुनील पाेलाजी पेंदाम पत्रपरिषदेला उपस्थित हाेते. यावेळी त्यांनी सांगितले की, गैरअर्जदार आशा गजानन इंदुलवार व तिचा मुलगा करण गजानन इंदुलवार हे दाेघेजण २ फेब्रुवारी २०२१ राेजी मंगळवारला आमच्या घरी येऊन उषा पेंदाम हिला अश्लील शब्दात शिवीगाळ करून चारित्र्यावर संशय घेतला. शिवाय जीवे मारण्याची धमकीही दिली. शिवीगाळ करीत ते आपल्या घरी निघून गेले. शिवीगाळ सहन न झाल्याने दुसऱ्या दिवशी ३ फेब्रुवारीला उषा पेंदाम हिने विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान ४ फेब्रुवारी राेजी रात्री २ वाजता जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू पावली. अंत्यसंस्कार आटाेपल्यावर या घटनेची गडचिराेली पाेलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पाेलिसांनी आराेपी आशा गजानन इंदुलवार हिच्यावर भादंविचे कलम ३०६ अन्वये ४ मार्चला गुन्हा दाखल केला. आठवडाभराचा कालावधी उलटूनही पाेलिसांनी आराेपी महिलेस अटक केली नाही, असे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात तपास अधिकारी सहायक पाेलीस निरीक्षक शरद मेश्राम यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांचा भ्रमणध्वनी बंद दाखवत हाेता.