गडचिरोली : लेकीचे हात पिवळे करायचे होते.. पै- पै जमवायचे होते.... पती सकाळी तारीख ठरविण्यासाठी वराच्या गावी गेले अन् आई मिरची तोडणीच्या कामाला.. पण वडील वराच्या गावी पोहोचण्याआधीच इकडे आई नाव दुर्घटनेत बुडाली. २४ जानेवारीला सकाळी ८ वाजता तिचा मृतदेह आढळला. रेवंता हरिश्चंद्र झाडे (४२, रा. गणपूर रै. ता. चामोर्शी) असं या दुर्दैवी मातेचं नाव.
मिरची तोडण्यासाठी नदीपात्रातून जाताना मजूर महिलांच्या दोन नाव बुडाल्या. एका नावेतील आठ जण सुखरूप वाचले तर दुसऱ्या नावेतील सहा महिलांना जलसमाधी मिळाल्याची हृदयद्रावक घटना गणपूर (रै.) येथील वैनगंगा नदीपात्रात २३ जानेवारी सकाळी साडेदहा वाजता घडली होती. नावाडी सुरेंद्र शिंदे (३०, रा. टोक ता. पोंभुर्णा जि. चंद्रपूर ) व सरुबाई सुरेश कस्तुरे (५८, रा. गणपूर रै.) हे थोडक्यात वाचले होते. २३ जानेवारी रोजी शोधकार्यानंतर जिजाबाई दादाजी राऊत (५५) व पुष्पा मुक्तेश्वर झाडे (४२, दोघी रा. गणपूर रै.) यांचे मृतदेह आढळले हाेते, तर चार जणी बेपत्ता होत्या. २४ रोजी सकाळी पुन्हा शोधकार्य सुरु केले. स्थानिक तरुण नावेतून तर राज्य आपत्ती निवारण दलाच्या दोन तुकड्या बोटेतून शोध घेत होत्या. रेवंता झाडे यांचा मृतदेह २४ रोजी सकाळी नाव उलटलेल्या ठिकाणापासून जवळच एका झुडूपाला अडकलेल्या स्थितीत गावातील तरुणांना आढळून आला. त्यांनी तो नावेतून बाहेर आणला. मायाबाई अशोक राऊत (४५) व सुषमा सचिन राऊत (२२) या सासू- सुनेसह बुधाबाई देवाजी राऊत (६५, तिघीही रा. गणपूर रै.) यांचा अद्याप शोध लागलेला नाही.
सुखाचे क्षण दु:खात, कुटुंब शोकमग्न
रेवंता झाडे यांचा मृतदेह आढळल्यानंतर कुटुंब शोकमग्न झाले. त्यांना मुलगी शेखर व कन्या काजल अशी दोन अपत्ये आहेत. मुलगा दहावीत शिकतो तर मुलगी काजल हिने पदवीचे शिक्षण घेतलेले असून चंद्रपूरच्या सावली तालुक्यातील सामदा गावात तिचा विवाह ठरला होता. २३ जानेवारीला पती हरिश्चंद्र झाडे हे काजलच्या लग्नाची तारीख ठरविण्यासाठी नियोजित वराच्या गावी सामदा येथे गेले होते. मात्र, वाटेतच त्यांना पत्नी बुडाल्याची माहिती कळाल्यावर ते परत आले. मुलीचे लग्न जुळल्यामुळे घरी आनंदाचे वातावरण होते, पण रेवंता यांच्या मृत्यूने सुखाचे क्षण दु:खात बदलले.राज्य आपत्ती निवारण दलाचे दोन चमू दाखल
गणपूर रै. येथील तीन महिला अद्यापही सापडलेल्या नाहीत. २४ जानेवारीला सकाळी नागपूरहून राज्य आपत्ती निवारण दलाचे दोन चमू दाखल झाले असून बोटेद्वारे तिघींचाही शोध सुरु आहे. पोलिस, महसूल विभागाचे अधिकारी तसेच गावकरी नदीकाठी ठाण मांडून आहेत.