गडचिरोली : आदिवासीबहुल गडचिरोलीतील आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न सातत्याने चर्चेत असतो. कारवाफा (ता.धानोरा) येथे कुटुंब नियोजन शस्त्रक्रेयेनंतर ४८ तासांतच एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ११ डिसेंबरला उजेडात आली. त्यामुळे पुन्हा एकदा ग्रामीण यंत्रणेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. शस्त्रक्रियेसाठी म्हणून गेलेल्या महिलेचा मृतदेहच आल्याने कुटुंबीय शोकमग्न झाले. दरम्यान, कुटुंबीयांनी डॉक्टरांवर निष्काळजीपणा केल्याचा आरोप केला आहे.
साधना संजय जराते (वय २३ , रा. कारवाफा) असे मृत महिलेचे नाव आहे. ८ डिसेंबरला कारवाफा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब नियोजन शिबीर घेण्यात आले होते. यात मृत साधना जराते यांची कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्यावर कारवाफा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केल्यानंतर प्रकृती खालावल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु १० डिसेंबरला मध्यरात्री त्यांची प्राणज्योत मालवली. कुटुंबाने आरोग्य विभागावर शस्त्रक्रियेत हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला असून दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे. यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भ्रमणध्वनी घेतला नाही, त्यामुळे त्यांची बाजू कळू शकली नाही.
दुर्गम भागात परिस्थिती बिकट
दरम्यान, जिल्ह्यातील दक्षिण गडचिरोली आरोग्य व्यवस्था खिळखिळी आहे. तेथे आधीच भौगोलिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे रुग्णांना झोळीतून रुग्णालयात आणावे लागते. तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव, भरमसाठ रिक्त पदे यामुळे आदिवासींना आरोग्य सेवा मिळवताना मोठी कसरत करावी लागते. ही परिस्थिती बदलणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दोन मुले प्रेमाला पारखी
मयत साधना या गृहिणी होत्या, तर पती हे स्वयंपाकी म्हणून कामे करतात. साधना यांना चार व दीड वर्षांची दोन मुले आहेत. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर आईचा मृत्यू झाल्याने ही दोन्ही भावंडे मातृप्रेमाला पारखी झाली आहेत. ११ डिसेंबरला सकाळी उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांकडे दिला. सायंकाळी कारवाफा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हुंदके व आश्रूंनी वातावरण सुन्न झाले होते.