लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भाजी म्हणून वापरले जाणारे जंगलातील कुड्याचे फूल गोळा करताना वाघाने केलेल्या हल्ल्यात महिला जागीच ठार झाली. ही घटना मंगळवार 18 मे रोजी दुपारी 4 वाजताच्या सुमारास दिभनापासून 2 किमी अंतरावरील जंगलात घडली.
वंदना अरविंद जेंगठे (40) रा. दिभना असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. ही महिला आपली मुलगी व अन्य 4 महिलांनासोबत दिभना जंगलात उत्तर दिशेला दुपारी गेली होती. हे क्षेत्र एफडीसीएम कंपार्टमेंट नं 2 मध्ये येते. कुड्याचे फूल गोळा करताना दुपारी 4 वाजता वंदना यांच्यावर वाघाने अचानक हल्ला केला. परंतु सोबतच्या महिलांच्या लक्षात ही बाब आली नाही. किंचित ओरडण्याचा आवाज आला. शहानिशा केल्यानंतर वाघाने वंदना यांच्यावर हल्ला केल्याचे महिलांच्या लक्षात आले. परंतु भीतीमुळे सर्व महिला गावाकडे परत आल्या व गावात सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर गावातील जवळपास 15 ते 20 नागरिक घटनास्थळ असलेल्या काळागोटा जंगल परिसरात गेले असता वंदना जेंगठे ही महिला मृतावस्थेत आढळून आली.
सदर घटनेची माहिती पोर्लाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम. पी. चांगले यांना देण्यात आली. त्यांनी सायंकाळी 6 वाजता जंगलात पोहोचून पंचनामा केला. गडचिरोली तालुक्यात येणाऱ्या या भागात आठवडाभरापूर्वी म्हणजे 10 मे रोजी 2 वेगवेगळ्या ठिकाणी 2 महिलांना वाघाने ठार केले. एवढेच नाही तर गेल्या 7 महिन्यात 6 महिला आणि 2 पुरुषांचा बळी वाघाने घेतला आहे.