लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : तीन महिलांसोबत गावालगतच्या जंगलात झाडू तयार करण्यासाठी गवत कापण्याकरिता गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केल्याची घटना शुक्रवार १७ डिसेंबरला दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली. अनुसया श्यामराव माेगरकर (५५, रा.राजगाटा चक) असे महिलेचे नाव आहे.
अनुसया माेगरकर गावातील अन्य तीन महिलांसोबत शुक्रवारी सकाळी गावापासून तीन किमी अंतरावर असलेल्या शेतशिवारातील जंगलात गेली. यावेळी त्याच परिसरात दाेन गुराखी बैल चारत हाेते. झाडूसाठी गवत कापत असतानाच अनुसयावर अचानक वाघाने झडप घातली व तिला जवळपास १०० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. याची चाहूल साेबतच्या महिलांना लागताच त्यांनी आरडाओरड केला. याचवेळी लगतचे गुराखीही धावून आले. परंतु वाघाच्या तावडीतून तिला साेडविण्याची कुणाचीच हिंमत झाली नाही. लगेच त्यांनी घटनेची माहिती गावात भ्रमणध्वनीवरून दिली. काही वेळातच गावातील नागरिक घटनास्थळी पाेहाेचले. त्यानंतर अनुसयाचा शाेध घेतला असता एका झुडुपात वाघ अनुसायाजवळ हाेता. लाेकांनी आरडाओरड करून वाघाला पळवून लावले. परंतु ताेपर्यंत अनुसया गतप्राण झाली हाेती. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली.
राजगाटातील तिसरी घटना
राजगाटा चेक येथील वाघाने हल्ला केल्याची ही तिसरी घटना आहे. पहिली घटना ६ नाेव्हेंबर २०२० राेजी घडली हाेती. यात गाेविंदा गावतुरे ठार झाले हाेते. त्यानंतर दुसरी घटना यावर्षीच्या उन्हाळ्यात घडली. यात एक इसम जखमी झाला हाेता. तर आता शुक्रवारी अनुसया माेगरकर ही महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाली.