गडचिराेली : पोलीस वसाहतीमधील शिपायाच्या घरी विष प्राशन करून आत्महत्या करणारी महिला पाेलीस शिपाई प्रणाली काटकर व तिचा प्रियकर पाेलीस शिपाई संदीप पराते हे मागील वर्षभरापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पण अलिकडे दोघांमध्ये खटके उडू लागले आणि त्यातूनच प्रणालीने जीवनयात्रा संपविली.
प्रणाली काटकर (वय ३५) असे मृत महिला पोलीस शिपायाचे नाव आहे. ती गडचिरोली मुख्यालयात कार्यरत होती. तर, पाेलीस शिपाई संदीप पराते याला पहिली पत्नी आहे. पहिल्या पत्नीच्या तक्रारीवरून संदीप पराते यांच्याविराेधात पाेलीस ठाण्यात काैटुंबिक हिंसाचारविराेधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या पत्नीसाेबत वाद असल्याने संदीप हा तिच्यापासून वेगळा राहत असला तरी घटस्फोट झाला नव्हता. त्यामुळे प्रणालीसाेबत लग्न हाेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे प्रणाली व संदीप हे दाेघेही मागील वर्षभरापासून लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत हाेते.
घटनेच्या दिवशी रात्री प्रणाली ही ओकारी करत असल्याचे लक्षात आल्यानंतर संदीपने तिला रुग्णालयात भरती केले. घटनास्थळी मात्र काेणतीही चिट्टी आढळून आली नाही. दाेन दिवसांनंतर पाेलिसांकडून या प्रकरणाचा तपास केला जाणार आहे. त्यानंतरच संदीप व प्रणाली यांच्यामध्ये नेमका काेणता वाद हाेता हे कळू शकेल.
आई-वडिलांच्या गावी झाले अंत्यसंस्कार
प्रणाली ही मूळची सिंदेवाही तालुक्यातील लाेणवाही येथील रहिवासी आहे. मृत्यूनंतर आईवडिलांनी प्रणालीचा मृतदेह स्वत:च्या गावी लाेणवाही येथे नेऊन अंत्यसंस्कार केले. त्यांच्या बयाणानंतर या घटनेची पार्श्वभूमी कळू शकेल.