लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत काम करणाऱ्या स्वयंपाकी महिलांचे मानधन वाढविण्यात यावे व त्यांचे थकीत मानधन त्वरित देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने केली आहे.
पक्षाच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांच्या नेतृत्वात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत निवेदन सादर केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंग यांचीही कार्यकर्त्यांनी भेट घेऊन चर्चा केली. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार ही योजना २०१५ पासून सुरू करण्यात अली असून, स्वयंपाकी म्हणून महिलांची फक्त १००० रुपये एवढ्या क्षुल्लक मानधनावर नियुक्ती करण्यात अली आहे. मागील ९ वर्षांपासून या महिला हे काम नियमितपणे आपले काम करून शासनाची व जनतेची सेवा करीत आहेत; परंतु अनेकदा मागणी करूनही त्यांच्या मानधनात वाढ करण्यात आलेली नाही. अंगणवाड्यांमध्ये संपूर्ण स्वयंपाक करण्याचे अतिशय महत्त्वाचे व मेहनतीचे काम या महिला करीत आहेत. एवढ्या कमी रकमेत महिलांकडून काम करून घेणे हे एकप्रकारे त्या महिलांचे शोषण आणि वेठबिगारी व मानव अधिकारांचे उल्लंघन आहे आणि समस्त महिलांचा अवमान आहे. शासनाच्या किमान वेतन कायद्याचे तर हे सरळसरळ उल्लंघन आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देताना रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत, जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. प्रकाश दुधे, प्रदेश सचिव प्रा. राजन बोरकर, केशवराव समृतवर, प्रदीप भैसारे, कृष्णा चौधरी, प्रल्हाद रायपुरे, अशोक खोब्रागडे, नरेंद्र रायपुरे, स्वयंपाकी संघटनेच्या गीता उईके, अंजू गेडाम, सरिता गवळे, प्रियांका रामटेके उपस्थित होते.
किमान २० हजार रुपये मानधन द्यावे स्वयंपाकी महिलांचे हे शोषण त्वरित थांबविण्यात यावे व त्यांचे मानधन किमान २० हजार रुपये करण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन पक्षाने यावेळी केली. हे निवेदन शासनाकडे पाठविण्याचे आश्वासन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी थकीत मानधन लवकरच अदा करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.