एटापल्ली पोलीस स्टेशनमध्ये ‘राखी विथ खाकी’ उपक्रमांतर्गत ५ गावे व ४ वाॅर्डांतील एकूण २० महिलांनी १६ पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधली. यावेळी पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील, पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे, परमेश्वर गरकळ व पोलीस कर्मचारी उपस्थित होते, तसेच हालेवारा पोलीस मदत केंद्रातही रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी परिसराच्या ७ गावांतील २३ गाव संघटनेच्या महिला सदस्यांनी २१ पोलीस दादांना राखी बांधून अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याची ओवाळणी मागितली. यावेळी प्रभारी अधिकारी धनाजी देवकर, अजय किरंकन, पोलीस उपनिरीक्षक विकास गाडे, तालुका संघटक किशोर मलेवार व आनंद कुमरी उपस्थित होते. देसाईगंज पोलीस ठाण्यात आयोजित कार्यक्रमात कुरूड, कोंढाळा, विसोरा व देसाईगंजच्या आंबेडकर वाॅर्ड, भगतसिंग वाॅर्ड, सिंधी कॉलनी, राजेंद्र वाॅर्ड, गांधी वॉर्ड, हटवार एरिया, नैनपूर वॉर्ड येथील महिला सहभागी झाल्या.
दरम्यान, महिलांनी पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधून अवैध दारूविक्री बंद करा, बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या दारूवर कारवाई करा, अशी एकमुखी ओवाळणी महिलांनी मागितली.
(बॉक्स)
गावकऱ्यांनी मदत करावी
दारूबंदी पथकाद्वारे अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करणे सुरू आहे. माहिती मिळताच धाड टाकली जात आहे. मात्र, गावातील अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी गावकऱ्यांची मदत आवश्यक आहे. गावकऱ्यांनी सहकार्य केल्यास अवैध दारूविक्रीचे प्रमाण कमी होईल, असे पोलीस निरीक्षक डॉ. जयस्वाल यांनी सांगितले. तेव्हा महिलांनी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.