लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : तालुक्यातील परसवाडी येथे महिलांनी मंगळवारी दारूविक्रेत्याच्या घरी धाड मारून गावठी दारू जप्त करून ती नष्ट केली. कोरेगाव आणि परसवाडी या दोन्ही गावातील महिला यात सहभागी झाल्या होत्या.आखाडी सणानिमित्त अविनाश उसेंडी या इसमाने विकण्याच्या निमित्ताने घरी दारू आणल्याची माहिती परसवाडी येथील महिलांना मिळाली. कोरेगाव च्या महिलांना सोबत घेऊन अहिंसक मार्गाने आंदोलन करण्याचे नियोजन महिलांनी केले. ठरल्याप्रमाणे महिला अविनाशच्या घरी पोहोचल्या असता काही जण तेथे दारू पीत असल्याचे महिलांच्या लक्षात आले. त्यांनी घराची झडती असता गावठी दारू आढळून आली. महिलांनी तात्काळ ती नष्ट केली. यावेळी मुक्तिपथ तालुका चमू आणि कोरेगाव चे पोलीस पाटील देखील उपस्थित होते. महिलांनी धानोरा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पण पोलीस गावात पोहोचेपर्यंत अविनाश आणि त्याचे वडील रावण उसेंडी या दोघांनीही पळ काढला. यापूर्वी देखील अविनाश च्या घरी दारू सापडली असून त्याच्यावर विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहे. गावात दारूविक्री बंदीचा ठराव घेण्यात आला आहे. दारूविक्री न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहे. तरीही अविनाश सातत्याने गावात दारूची विक्री करीतच असल्याने त्यास अटक करून कठोर शिक्षा करावी अशी मागणी महिलांनी यावेळी केली. याप्रकरणी पोलिसांनी त्यास ठाण्यात बोलावून समज देत असे प्रकार न करण्याची सूचना दिल्याचे सांगण्यात येत आहे.
महिलांनी नष्ट केली गावठी दारू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 10:47 PM
तालुक्यातील परसवाडी येथे महिलांनी मंगळवारी दारूविक्रेत्याच्या घरी धाड मारून गावठी दारू जप्त करून ती नष्ट केली. कोरेगाव आणि परसवाडी या दोन्ही गावातील महिला यात सहभागी झाल्या होत्या.
ठळक मुद्देदारूबंदीचा ठराव : कोरेगाव व परसवाडी येथील महिलांनी दाखविली हिंमत