तालुक्यातील वाकडी येथे १० वर्षांपासून अवैध दारूविक्री बंद होती. मात्र, निवडणुकीच्या काळात दारूची मागणी वाढल्याने झटपट पैसे कमविण्याच्या उद्देशाने गावातील ५ जणांनी अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे गावात मुक्तिपथ अभियानाच्या माध्यमातून गाव संघटना पुनर्गठित करून अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी नियोजन करण्यात आले. त्यानुसार २५ एप्रिल रोजी गावातील अवैध दारूविक्रेत्यांना गावात अवैध दारू विक्री न करण्याचे गावसंघटनेच्या माध्यमातून ठणकावून सांगण्यात आले. तरीसुद्धा गावात अवैध दारूविक्री सुरू असल्याची माहिती गाव संघटनेच्या महिलांना मिळाली. त्यानुसार महिलांनी अहिंसक कृती करीत शोधमोहीम राबविली. दरम्यान, मुरलीधर वेलादी याच्याकडे ६ लिटर मोहफुलाची दारू आढळून आली. या घटनेची माहिती गडचिरोली पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून अवैध दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई एपीआय शरद मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार मरस्कोल्हे, कोडापे यांनी केली.
महिलांनी दारूविक्रेत्याला केले पाेलिसांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 4:37 AM