लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासींच्या शोषणाविरुद्ध क्रांतिकारी लढा देण्याच्या नावाखाली अल्पवयीन आदिवासी मुला-मुलींना नक्षल चळवळीत भरती केले जाते. पण प्रत्यक्षात त्यांची नसबंदी करून महिला नक्षलींवर लैंगिक अत्याचार केले जातात, अशी व्यथा आत्मसमर्पित महिला नक्षल कमांडर-उपकमांडर यांनी व्यक्त केली असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. महिला नक्षलींबाबत प्रथमच ही माहिती समोर आली आहे.
बुधवारपासून सुरू झालेल्या नक्षलवाद्यांच्या शहीद सप्ताहानिमित्त विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. निलाभ रोहन (भापोसे) यांनी काढलेल्या पत्रकात हा दावा करण्यात आला. डॉ. रोहन यांनी पत्रकात नमूद केल्यानुसार, अल्पवयीन मुला-मुलींना भूलथापा देऊन नक्षली आई-वडिलांपासून विभक्त करतात. जंगलात नेऊन त्यांचे बालपण हिरावून घेतात व त्यांच्या हातात जबरीने शस्त्र देऊन त्यांचा नाहक बळी घेतात. शहीद सप्ताहात नक्षलवादी गावात शिरून बंदुकीच्या जोरावर विध्वंसक कृत्य करून विकासकामांमध्ये अडथळे निर्माण करतात. आदिवासी बांधवांच्या रोजगारासाठी आणि परिसराच्या विकासासाठी महत्त्वाच्या असलेल्या सुरजागड लोहखनिज प्रकल्पातही त्यांनी अडथळे आणले. त्यामुळे नक्षल्यांना आदिवासी समाजाचा विकास करायचा नाही हे स्पष्ट असल्याचे डॉ. रोहन यांनी म्हटले आहे. त्यामुळे शहीद सप्ताहात नक्षल्यांच्या कुठल्याही प्रचार सभेला किंवा कार्यक्रमाला नागरिकांनी विरोध करावा, असे आवाहन त्यांनी आपल्या पत्रकात केले आहे.
दीड वर्षात ४० नक्षल्यांना कंठस्नान
नक्षलवादी आपले अपयश झाकण्यासाठी मागील वर्षी महाराष्ट्र-मध्यप्रदेश-छत्तीसगड झोनमध्ये फक्त ८ नक्षली मारले गेल्याचा अपप्रचार करत आहेत. वास्तविक केवळ महाराष्ट्रात २०२० मध्ये १८ तर २०२१ मध्ये २२ असे गेल्या दीड वर्षात ४० नक्षली मारले गेले असल्याचाही दावा डॉ. निलाभ रोहन यांनी केला आहे.