गडचिराेली : प्रगत कृषी तंत्रज्ञान जाणून घेऊन या तंत्रज्ञानाचा उपयाेग आपल्याही शेतीत करण्याच्या उद्देशाने पाेलीस विभागाने दुर्गम भागातील महिलांसाठी कृषी दर्शन सहलीचे आयाेजन केले आहे. २ फेब्रुवारी राेजी सहल गडचिराेलीवरून रवाना झाली. दुर्गम भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावे, यासाठी पाेलीस विभागाकडून विविध उपक्रम दरवर्षी राबविले जातात. यावर्षी जिल्हा पाेलीस दलाने पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल यांच्या मार्गदर्शनात महिलांची कृषी दर्शन सहल आयाेजित करण्याचे नियाेजन केले. एटापल्ली तालुक्यातील काेटमी व एटावाही या गावातील ४२ महिलांची निवड करण्यात आली. महिला विदर्भातील विविध भागांना भेटी देऊन नाविन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञान व उपक्रम जाणून घेणार आहेत. महिलांसाठी अशा प्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच राबविला आहे.
२ फेब्रुवारी राेजी कृषी दर्शन सहल गडचिराेलीवरून रवाना झाली. जिल्हा पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल यांनी कृषी दर्शन सहलीला हिरवी झेंडी दर्शविली. यावेळी अपर पाेलीस अधीक्षक मनीष कलवानिया, समीर शेख उपस्थित हाेते. सहलीसाठी एटापल्लीचे उपविभागीय पाेलीस अधिकारी सुदर्शन पाटील, काेटमी पाेलीस मदत केंद्राचे उपनिरीक्षक सदाशिव देशमुख, सहायक पाेलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी प्रयत्न केले. यावेळी जिल्हा पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल म्हणाले, जिल्ह्यात कृषी क्रांती घडवून आणण्यासाठी अनेक उपक्रम राबविण्याचा पाेलीस विभागाचा प्रयत्न राहणार आहे. राज्यात कृषी क्षेत्रात प्रगत असलेल्या पश्चिम महाराष्ट्रासह इतरही जिल्ह्यांमध्ये सहलीचे आयाेजन केले जाईल, असे आश्वासन दिले.
बाॅक्स ....
या ठिकाणांना देणार भेटी
कृषी विज्ञान केंद्र साकाेली, संत्रा संशाेधन केंद्र नागपूर, पंजाबराव कृषी विद्यापीठ अकाेला, सेवाग्राम आश्रम वर्धा, ताडाेबा राष्ट्रीय उद्यान, बांबू हस्तकला प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली येथे भेट देणार आहेत.