गडचिरोली: गावठी मोहफुलाच्या दारूची विक्री करणाऱ्या तिघांच्या घरी चातगावच्या महिलांनीपोलिसांच्या सहकार्याने धाड टाकून १० हजारांचा दारूसाठा व मोहाफूल जप्त केले. त्या तीनही दारू विक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे त्या तिघांमध्ये दोन महिला आरोपी आहेत.
मागील १० ते १२ वर्षांपासून चातगाव येथे दारूविक्री बंद आहे. त्यामुळे गावात दारुमुळे कधीही भांडणे किंवा विवाद होत नाही. पण काही महिन्यांपासून चार जण लपून-छपून गावठी दारू गाळून तिची विक्री करीत आहेत. ही बाब महिलांच्या लक्षात आली. त्यामुळे येथील महिलांनी या विक्रेत्यांना दारूची विक्री न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पण विक्रेत्यांनी त्या इशाऱ्याकडे कानाडोळा केला.
गेल्या गुरूवारी महिला व मुक्तिपथ अभियानाच्या कार्यकर्त्यांनी वर्षा उईके या महिलेच्या घराची झडती घेतली असता मोहसडवा सापडला. या कारवाई संदर्भात चर्चेनंतर विक्रेत्या महिलेला समज देण्यासाठी शनिवारी गाव संघटनेच्या सदस्य तिच्या घरी गेल्या. आसपास दारू असल्याचा संशय येताच महिलांनी घरासभोवतालचा परिसर पिंजून काढला असता तिघांच्या घरी दारू व मोहसडवा सापडला. ही माहिती मिळताच चातगाव पोलिसांची चमू घटनास्थळी पोहोचली आणि तीन घरांची तपासणी करून मडक्यात ठेवलेला मोहाचा सडवा व दारू जप्त केली.