चंदा मगर यांचे आवाहन : चामोर्शीत समाज प्रबोधन मेळावा चामोर्शी : पूर्वीच्या काळी महिलांची अवस्था दयनीय होती. त्यामुळे त्यांना जीवन जगने कठीण झाले होते. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्योतिबा फुले यांना सोबत देऊन महिलांसाठी शिक्षणाची दारे खुली करून दिली. त्यामुळे सावित्रीबाईचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिलांनी प्रगतीची कास धरावी, असे आवाहन अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी संशोधन अधिकारी चंदा मगर यांनी केले. प्रेरणा बौद्ध मंडळ, रमाबाई मंडळ, ओबीसी, कुणबी, माळी समाज संघटना चामोर्शीच्या वतीने येथील लुंबिनी बौद्ध विहारात समाजप्रबोधन व सत्कार सोहळा नुकताच पार पडला. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चामोर्शीच्या नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. सुरेश डोहणे, तसेच सत्कारमूर्ती म्हणून नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी आर्शिया जुही, पोलीस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. डॉ. सुरेश डोहणे म्हणाले, महिलांनी स्वत:मध्ये विचारांती बदल करणे काळाची गरज आहे. बहुजणांनी आता अन्याय व अत्याचार सहन करू नये, काल्पनिक विचारात न जगता आधुनिक विचारांनी जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे, आजच्या महिला उद्याच्या समाजाची निर्मिती करतात, त्यामुळे चिंतनशील समाज निर्माण होणे महत्त्वपूर्ण आहे, असेही प्रा. डोहणे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविता झाडे, संचालन अर्चना तुरे यांनी केले तर आभार योगीता आदे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रेरणा बौद्ध मंडळाचे अध्यक्ष धीरज उराडे, सचिव ओमप्रकाश साखरे, कोषाध्यक्ष रवींद्र उराडे, उपाध्यक्ष बारसागडे, प्रा. रामटेके, कालिदास बन्सोड, मारोती दुधबावरे, गोकुल झाडे, प्रा. संजय म्हस्के, हिरामण गोहणे, ऋषीदेव कुनघाडकर, अविनाश भोवरे, दिनेश चुधरी, सुनील कावळे आदींनी सहकार्य केले. याप्रसंगी मुख्याधिकारी आर्शिया जुही, पोलीस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे यांचा मंडळातर्फे सत्कार करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)
महिलांनी प्रगतीची कास धरावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2017 12:54 AM