लोकमत न्यूज नेटवर्कभामरागड : जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, गटचर्चा आदीद्वारे अभ्यास केला तर यश नक्कीच मिळते. महिलांनी लहान पदांचे स्वप्न न बघता फौजदार, डी.वाय.एस.पी. व आय.पी.एस. असे मोठ्या पदांचे स्वप्न बघावे. पोलीस खात्यात महिलांसाठी राखीव जागा असतात त्याचा फायदा घ्यावा. त्यासाठी आपले ध्येय उच्च बाळगावे, असे प्रतिपादन माजी पोलीस महासंचालक डॉ. मीरा बोरवणकर यांनी केले.हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पास डॉ. मीरा बोरवणकर यांनी शुक्रवारी सदिच्छा भेट दिली. यावेळी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांशी त्यांनी मुक्त संवाद साधला. तसेच प्रकल्पातील विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. प्रकल्पाचे संचालक अनिकेत आमटे व आश्रम शाळेच्या व्यवस्थापिका समीक्षा आमटे यांनी प्राणी अनाथालय, बांबूहस्तकला, ग्रंथालय, हॉस्पिटल, संगणक कक्ष, आश्रमशाळा तसेच प्रकल्प व शाळेतील विविध उपक्रमांची माहिती बोरवणकर यांना दिली. डॉ. बोरवणकर यांनी आपल्या जीवनातील आठवणींना उजाळा दिला. पंजाबमधील फाजलिका येथील सरकारी शाळेत आपले शिक्षण झाले. ५ कि.मी. चा प्रवास करून सायकलवरुन शाळेत जावे लागायचे. वडील पोलीस (बी.एस.एफ.) सेवेत होते. त्यावेळच्या परिस्थितीनूसार एक स्त्री पोलीस सेवेत जाण्यास वडिलांकडून अनुकूलता नव्हती. तेव्हा मला इंग्रजीची अडचण होती. मात्र मी जाणीवपूर्वक प्रयत्नाची पराकाष्ठा केली व स्पर्धा परीक्षेची तयारी करून आयपीएसचे स्वप्न साकार केले. याप्रसंगी युनिक अकॅडमी नागपूर केंद्राचे प्रमुख बी. बी. गायकवाड यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांसाठी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे, प्रकल्पातील जेष्ठ कार्यकर्ते मनोहर येम्पलवार, पोलीस अधिकारी उपस्थित होते.
महिलांनी उच्च ध्येय बाळगावे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2018 1:15 AM
जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, गटचर्चा आदीद्वारे अभ्यास केला तर यश नक्कीच मिळते. महिलांनी लहान पदांचे स्वप्न न बघता फौजदार, डी.वाय.एस.पी. व आय.पी.एस. असे मोठ्या पदांचे स्वप्न बघावे. पोलीस खात्यात महिलांसाठी राखीव जागा असतात त्याचा फायदा घ्यावा.
ठळक मुद्देमीरा बोरवणकर यांचे आवाहन : लोकबिरादरी प्रकल्पाला भेट; विद्यार्थ्यांशी संवाद