लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : महिलांच्या हातातही एसटी बसचे स्टेअरिंग देत आहे, असा मोठा गाजावाजा करून राज्य परिवहन महामंडळाने राज्यभरात २३६ महिला चालक कम वाहकांना ऑगस्ट २०१९ मध्ये नियुक्ती दिली. मात्र कोरोनामुळे त्यांचे प्रशिक्षण थांबविण्यात येत असल्याचे पत्र एसटी महामंडळाने काढले आहे. त्यामुळे या महिला आता अधांतरी झाल्या असून त्यांच्यावर पुन्हा बेरोजगारीचे संकट कोसळले आहे.
एसटी महामंडळात चालक पदावर केवळ पुरूष उमेदवाराचीच नेमणूक केली जाते. पण या पदावरील पुरूषांची मक्तेदारी हटवत २०१९ मध्ये एसटी महामंडळाने पहिल्यांदाच २३६ महिला उमेदवारांची नियुक्ती केली. त्यात २१ आदिवासी समाजातील युवतीही होत्या. त्यांची ‘चालक कम वाहक’ म्हणून निवड केल्यानंतर २३ ऑगस्ट २०१९ रोजी पुणे येथे आयोजित भव्य कार्यक्रमात भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते या महिला चालकांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या महिला चालकांना प्रशिक्षण काळात विद्यावेतन दिले जाईल व प्रशिक्षणानंतर वाहन चालविण्याचा परवाना देऊन त्यांना एसटीत नोकरीत दिली जाईल, असे आश्वासन तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिले होते. या उपक्रमाला राज्यभरातून मोठी प्रसिद्धी मिळाली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता त्यांचे प्रशिक्षण थांबविण्यात आले. त्यामुळे त्या महिलांसमोर आता रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रतिकूल परिस्थितीत जगणाऱ्या महिलांना एका वेगळ्या क्षेत्रात झेप घेण्याची संधी निर्माण झाली होती, मात्र ती संधीही हिरावून घेतल्या जात आहे. त्यांना पुन्हा कधी संधी दिली जाणार हे अजून निश्चित नाही.
एसटीचे चालक म्हणून महिला जबाबदारी सांभाळणार होत्या. यातून महिला सक्षमीकरणाचा संदेश समाजात जाणार होता. मात्र एसटी महामंडळाने त्यांचे प्रशिक्षण बंद करून केवळ या उमेदवारांचेच नव्हे तर इतरही महिलांचे मनोधैर्य खचविले आहे. या महिला चालकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू.- रेखा बाळेकरमकर,निर्भया प्रमुख, गडचिरोली विभाग