सिरोंचा (गडचिरोली) : तालुक्यातील अतिदुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिटूर गावात सध्या हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावीे लागत आहे. या गावालगत तेलंगणाचे मेडीगट्टा धरण आहे, पण त्याचा काहीही फायदा चिटूरला होत नसल्याने पाणीसमस्या कायम आहेे.
अमरेली मार्गावर चिटूर हे सव्वाशे उंबरे व सहाशे लोकसंख्येचे गाव आहे. तेलंगणापासून जवळच असलेल्या या गावात उन्हाळा सुरू झाला की पाणीटंचाई सुरू होते. गतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला, पण याचा काहीही फायदा झाला नाही, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. गावात अद्याप पाणी योजना राबविलेली नाही, त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी गावकरी वणवण भटकत असल्याचे दिसत आहे. गावालगत चिलमेला ओढा आहेे, त्या ठिकाणी झरा तयार करून डोक्यावर घागर व इतर भांडे घेऊन पाणी आणावे लागत आहे.
ना रस्ता ना आरोग्य सुविधा
चिटूरमध्ये अद्याप पक्का रस्ताही नाही, आरोग्य सुविधेचा अभाव आहे. गावात दर पाच वर्षांनी निवडणुकीत मते मागण्यासाठी लोकप्रतिनिधी येतात, पुन्हा फिरकतही नाहीत. स्वातंत्र्यप्राप्तीला ७५ वर्षे होत आली, पण येथील विकासाचे प्रश्न अजून सुटलेले नाहीत.
चिलमेला ओढ्याचाच एकमेव आधार
गावात पाणीयोजना राबविलेल्या नाहीत. उन्हाळ्यात विहिरी कोरड्याठाक पडतात, बोअरचे पाणीही आटते. त्यामुळे एकमेव चिलमेला ओढ्याचाच गावकऱ्यांना आधार आहे. विजेच्या समस्येचे भिजत घाेंगडे कायम आहे, त्यामुळे नागरिकांची नाराजी वाढत चालली आाहे.