लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस विभागाच्या वतीने शुक्रवारी गडचिरोली शहरातील मुख्य मार्गावर तब्बल चार किलोमीटरची मानवी साखळी तयार करण्यात आली. यात जिल्ह्याच्या विविध भागातील १२ हजार विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. या मानवी साखळीला ‘बेबी मडावी आदिवासी महिला विकास साखळी’ असे नाव देण्यात आले. पहिल्यांदाच तयार झालेली एवढी मोठी मानवी साखळी शहरात चर्चेचा विषय ठरली.नक्षल दहशतीला न जुमानता पोलीस दलात भरती होण्यासाठी तयारी करणाऱ्या बेबी मडावी या भामरागड तालुक्यातील सुशिक्षित आदिवासी तरुणीची सप्टेंबर २०१८ मध्ये नक्षलवाद्यांनी अपहरण करून नंतर तिची हत्या केली. महिला दिनाचे औचित्य साधून तिला श्रद्धांजली वाहन्यासह आदिवासी तरुणींना नक्षलवादाविरूद्ध लढण्याची प्रेरणा मिळावी यासाठी सदर मानवी साखळीचे आयोजन केले होते. सकाळी १०.३० वाजता इंदिरा गांधी चौकात बेबी मडावी हिच्या प्रतिमेचे पूजन करून मौन पाळून तिला श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी गडचिरोली-गोंदिया परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक हरी बालाजी, डॉ.मोहितकुमार गर्ग, नगराध्यक्ष योगीता पिपरे, महिला आर्थिक विकास मंडळाच्या वरिष्ठ कार्यक्रम समन्वयक कांता मिश्रा आदी उपस्थित होते.उपस्थितांना मार्गदर्शन केल्यानंतर खुल्या वाहनातून जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी मानवी साखळीचे निरिक्षण केले. यावेळी महिला शक्ती जिंदाबाद, नक्षल्यांचा निषेध असो, अशा प्रकारच्या घोषणा महिलांनी दिल्या.या कार्यक्रमात अनेक सामाजिक संघटना तसेच बचत गटांच्या महिलांही सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाचे संचालन पोलीस उपनिरीक्षक प्रशांत दिवटे यांनी केले.तीन विद्यार्थिनींचा सत्कारइंदिरा गांधी चौकातील कार्यक्रमात विशेष कामगिरी करणाऱ्या तीन विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. त्यात राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत रनिंगमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या रिणा सुकरू गावडे, राज्यस्तरीय उंच उडी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या किरण धिसू मडावी, स्के मार्शल आर्ट या क्रीडा प्रकारात यश मिळवून राष्टÑपती पदकाची मानकरी ठरलेली एंजल देवकुले या तीन विद्यार्थिनींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.आदिवासी हेच नक्षलवाद्यांचे खरे लक्ष्य -अंकुश शिंदेआदिवासींना त्यांच्या विकासापासून दूर ठेवून त्यांच्यावर राज्य करणे हे नक्षलवाद्यांचे प्रमुख ध्येय आहे. हे ध्येय साध्य करण्यासाठी त्यांच्याकडून जाळपोळ, मारहाण आदी प्रकार जाणूनबुजून घडवून आणले जातात. पोलिसांचा खबºया हे कारण पुढे करून आदिवासींची हत्या केली जाते. नक्षली दहशतीमुळे अनेकांना गाव सोडावे लागले आहे. या नक्षलवादाचा विरोध प्रत्येकाने केला पाहिजे, असे आवाहन पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे यांनी केले.च्आदिवासी महिलांच्या शिक्षण व विकासात नक्षलवाद्यांकडून अडथळे आणले जात आहेत. त्यांचे मनसुबे हाणून पाडण्यासाठी लोकशाही मार्गाने लढा द्या. त्यासाठी सर्व महिलांनी आपला मतांचा अधिकार १०० टक्के वापरा. तेच त्यांच्यासाठी उत्तर असेल, असे जिल्हाधिकारी शेखर सिंग यावेळी म्हणाले. ज्या युवतींनी वयाची १८ वर्षे पूर्ण केली त्यांनी मतदार यादीत नाव नोंदवावे, सर्व महिलांनी आपले मतदार यादीत नाव आहे किंवा नाही याची खात्री करावे, असेही आवाहन त्यांनी केली.च्गेल्या तीस वर्षात नक्षलवाद्यांकडून या जिल्ह्यातील महिलांवर अत्याचार करून त्यांच्या विकासात अडथळे आणले. यापुढे असे होऊ देणार नाही असा संकल्प करूया, असे यावेळी पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले.च्एखादी महिला प्रगती करीत असेल तर तिचा विरोध न करता इतर महिलांनी तिला सहकार्य करावे. महिलेवर अत्याचार होत असल्यास महिलांनी एकजूट दाखवून लढा द्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांनी केले.
महिला दिन : नक्षल्यांकडून हत्या झालेल्या बेबी मडावीला अनोखी श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 1:11 AM