गडचिरोली : शेतकऱ्याने घरी ठेवलेल्या सागवानी पाट्या जप्त करून या प्रकरणी कारवाई न करण्यासाठी तीन हजार रूपयांची लाच घेणाऱ्या अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ येथील महिला वनरक्षक प्राची अशोकराव काळे हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी २६ मे रोजी आलापल्ली येथील शासकीय निवासस्थानी रंगेहात पकडले. तक्रारकर्त्याने १० वर्षांपूर्वी शेतातील सागाचे झाड कापून पाट्या तयार केल्या होत्या व घरीच ठेवल्या होत्या. वनरक्षक प्राची काळे हिला याबाबतची माहिती प्राप्त झाली. तिने तक्रारदाराच्या घराची झडती घेतली व जप्त केलेल्या पाट्या पोलीस पाटलाच्या घरी ठेवल्या. कोणतीही कारवाई करायची नसेल तर प्राची काळे हिने तीन हजार रूपयांची लाच मागितली. सदर शेतकऱ्याने याबाबतची तक्रार एसीबी कार्यालय गडचिरोली येथे केली. त्यानुसार सापळा रचून कारवाई करण्यात आली. तीच्या विरोधात गुन्हा दाखल करून लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी हाती घेतली आहे.(प्रतिनिधी)
लाच घेताना महिला वनरक्षकास अटक
By admin | Published: May 27, 2016 1:25 AM