सिरोंचा : दरवर्षी उन्हाळ्यात झाडूची कापणी करून त्यांची विक्री शहर व मध्यवर्ती गावात करण्याचे काम झिंगानूर परिसरातील महिला करीत होत्या. आता फेब्रुवारी महिना सुरू झाला असून, महिला झुडपी जंगलात जाऊन झाडूची कापणी करीत असताना दिसून येत आहेत.
तालुका मुख्यालयापासून ६५ कि.मी. अंतरावर असलेल्या झिंगानूर, रमेशगुडम, कोपेला आदी गावांतील महिला घनदाट जंगलात जाऊन विशिष्ट प्रकारच्या गवताची कापणी करून त्यापासून झाडू तयार करतात. झाडूचे मूठभर वेगवेगळे गठ्ठे बांधून स्वस्त दरात ग्रामीण भागासह शहरी भागात विक्री करतात. त्यांचा हा व्यवसाय अनेक वर्षांपासून सुरू आहे. दरवर्षी उन्हाळ्यात झाडू कापण्याचे काम महिला करीत आहेत. विशेष म्हणजे उन्हाळ्यात हाताला काम राहत नसल्याने या महिला झाडू कापणीच्या माध्यमातून राेजगार मिळवीत असतात.