पणती स्त्रीशक्ती संघटनेची स्थापना : महिला व बालकल्याणावर राहणार भरगडचिरोली : स्त्री सध्या कोणत्याही क्षेत्रात मागे नाही. परंतु दररोज महिलांवर अन्याय, अत्याचाराच्या घटना घडतात. महिलांचे अधिकार व हक्क अबाधित राहावे, अन्यायाच्या परिमार्जनासाठी स्त्रिया एकजूट व्हाव्या या हेतूने गडचिरोली येथे ‘पणती स्त्री शक्ती संघटने’ची स्थापना शनिवार ८ एप्रिलला करण्यात आली. आयोजित कार्यक्रमात संघटनेचे रीतसर उद्घाटन करण्यात आले.प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंटच्या परिसरात पार पडलेल्या कार्यक्रमात प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून शकुंतला पद्मावार यांचा सत्कार शिक्षिका वंदना मुनघाटे, स्मिता लडके यांच्या हस्ते करण्यात आला. महिला सक्षमीकरण व बालकल्याण ही या संघटनेची उद्दिष्ट्ये असून समाजातील गरजवंतांना मदत करणे हा प्रमुख उद्देश आहे. याप्रसंगी निकिता पारपेल्लीवार यांनी प्रार्थना व गीते सादर केली. संघटनेच्या संयोजिका प्राचार्य सविता सादमवार यांनी सर्व महिलांना शपथ दिली व संघटनेच्या पुढील कार्यवाही संदर्भात चर्चा घडवून आणली. दरम्यान महिलांशी संबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यावेळी वंदना मुनघाटे, स्मिता लडके, प्राचार्य लीना हकीम, प्रा. योगिता सानप, छाया पद्मावार, सुनंदा खोरगडे, डॉ. सुधा सेता, माधुरी दहीकर, वर्षा चडगुलवार, प्रा. वैैशाली येगोलपवार, प्रा. अर्चना चंदनपाट, चंदनखेडे, कांचन चौधरी, प्रा. विजया चव्हाण, रिझवाना पठाण, लक्ष्मी केतकर व ४० ते ५० महिला उपस्थित होत्या. संचालन करिश्मा राखुंडे यांनी केले. तीन महिन्यांपूर्वी विशिष्ट उद्देशाने महिलांची व्हॉट्सअॅपवर संघटनात्मक बांधणी करण्यात आली. पुणे, मुंबईपासून विविध क्षेत्रातील महिला यात सहभागी झाल्या. ८ मार्चला महिलांचा आॅनलाईन परिचय देण्यात आला. यात पंढरपूर येथील पालवी संस्थेच्या संचालिका मंगल शहा सहभागी झाल्या. त्यामुळे शहरात स्त्रीशक्ती मोठ्या प्रमाणात एकजूट होण्यास मदत झाली. (शहर प्रतिनिधी)
सक्षमीकरणासाठी महिला एकजूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2017 1:02 AM