मुलचेरा (गडचिरोली)- एप्रिल महिन्यात पोलीस-नक्षल चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांच्या मृत्यूचा बदला म्हणून जिल्ह्यात अनेक ठिकाणी नक्षलवाद्यांचा धुमाकूळ सुरू आहे. त्यात गुरुवारी नक्षलवाद्यांनी मुलचेरा येथील महाराष्ट्र वनविकास महामंडळाचा लाकूड डेपो जाळून मोठे नुकसान केले. रात्री लावलेली ही आग सकाळी 10 वाजताही विझलेली नव्हती.रात्री 1 वाजताच्या सुमारास आलेल्या सशस्त्र नक्षल्यांनी आधी वनविभागाच्या नाक्यावर जाऊन तेथील रेकॉर्ड रस्त्यावर टाकून जाळले. त्यानंतर वन कर्मचाऱ्यांच्या वसाहतीलगत असलेल्या लाकूड डेपोला आग लावली. विशेष म्हणजे रात्रभर ही आग धगधगत असल्याने वनविकास महामंडळाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.सकाळी 6.30 वाजतापासून आग विझविण्यास सुरुवात झाली. गडचिरोली नगर परिषद, अहेरी नगर पंचायतच्या तँकरने आग विझविने सुरूच होते. या आगीत सागवानासह अन्य प्रजातींची हजारो लाकडे जळून राख झाली. गेल्या 8 मे रोजी नक्षलवाद्यांनी याच परिसरात दोन ट्रक जाळले होते. तर 19 मे च्या मध्यरात्री आलापल्ली-भामरागड मार्गावरील तलवाडा येथील लाकूड डेपोला आग लावली होती. त्यानंतर पाचव्या दिवशीच मुलचेरा येथे पुन्हा अग्नितांडव घडवून आणले. नक्षल्यांनी घटनास्थळी काही पत्रके टाकली असून त्यात 22 एप्रिल रोजी कसनासूर जंगलात झालेल्या चकमकीचा निषेध केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ नक्षल्यांनी 19 ते 25 मेदरम्यान जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. काल नक्षल्यांनी रस्त्यावर झाडे आडवी टाकून भामरागड-कोठी रस्ता अडविला होता.
नक्षलवाद्यांनी लावलेल्या आगीत लाकूड डेपो जळून खाक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2018 1:34 PM