मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे : दिल्लीला जाऊनही पुरातत्त्व विभागाकडून प्रतिसाद नाही चामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मार्र्कंडादेव येथील देवस्थानच्या जीर्णाेद्धाराचे काम अकरा महिन्यांपासून रेंगाळले असल्याने फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्रीत भाविकांची दर्शनासाठी अडचण होण्याची शक्यता आहे. ११ महिन्यांपासून रखडलेले हे काम सुरू व्हावे, यासाठी देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी दिल्ली येथे गेले होते. तेथे त्यांनी पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र त्यानंतरही काम सुरू झाले नाही. या संदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, खा. अशोक नेते यांचीही भेट घेतली. मात्र अद्याप कामाला सुरूवात झालेली नाही. मंदिराचा संपूर्ण कळस उकलून ठेवण्यात आला आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष गजाननराव भांडेकर यांनी दिली आहे. मार्र्कंडादेव येथील देवस्थानच्या जीर्णाेद्धाराचे काम दोन महिन्यांत पूर्ण करू, असे आश्वासन काम सुरू करण्यापूर्वी देण्यात आले होते. त्यानंतर जानेवारी २०१६ मध्ये देवस्थानच्या जीर्णाेद्धारास सुरूवात झाली. येथे दगडही पोहोचले. मात्र ११ महिन्यांचा कालावधी उलटूनही काम अपूर्ण आहे. विशेष म्हणजे जीर्णाेद्धाराचे काम पूर्णत: रेंगाळले आहे. नागपूर येथील पुरातत्त्व विभागाच्या अधीक्षिका नंदिनी शाहू यांच्या कार्यकाळात या कामाला सुरूवात झाली होती. परंतु काही कारणास्तव त्यांची बदली झाल्याने जीर्णोद्धाराच्या कामाची जबाबदारी रायपूर येथील पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडे गेली. मात्र अद्यापही कामात गती आली नाही. हे काम पुन्हा जोमाने सुरू व्हावे म्हणून डिसेंबर महिन्यात मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिल्ली येथे जाऊन पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र त्यांनासुद्धा या भेटीत प्रतिसाद मिळाला नाही, अशी स्थिती आहे, असे भांडेकर यांनी सांगितले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष घालावे, अशी मागणीही ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)
मार्कंडा मंदिराचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2016 1:54 AM