महाराष्ट्राच्या बाजूने प्रारंभ : विरोधाला न जुमानता कामाला गतीलोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्याच्या सीमेवरील मेडिगड्डा प्रकल्पाच्या कामाला मागील दोन महिन्यांपासून सुरूवात झाली असून सध्या प्राथमिक स्तरावरील काम जोमात सुरू आहे. सिरोंचा तालुका मुख्यालयापासून २२ किमी अंतरावरील पोचमपल्ली गावाजवळील गोदावरी नदीपात्रात सदर प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पाच्या विरोधात आंदोलने, मोर्चे काढण्यात आले. तर राज्यकर्त्यांना काळे झेंडेही दाखविण्यात आले. विविध आंदोलनांनी मेडिगड्डा प्रकल्प गाजले होते. त्यामुळे सदर प्रकल्प वादग्रस्तही ठरला होता. या प्रकल्पाचा तेलंगणाच्या मेडिगड्डा गावातील नदीपात्रावर भूमिपूजन तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू असताना काँग्रेस व आविसच्या नेत्यांनी समर्थकांसह काळे झेंडे दाखवून प्रकल्पाविरोधात घोषणा देऊन आंदोलन केले होते. या प्रकल्पात काही शेतकऱ्यांच्या शेत जमिनी जात आहेत. अशा शेतकऱ्यांना तेलंगणा सरकारकडून एकरी साडे दहा लाख मोबदला दिला जाणार आहे. काही शेतकऱ्यांनी मोबदला स्वीकारून जमिनीचे हस्तांतरण केले आहे. परंतु अद्यापही काही शेतकऱ्यांच्या शेत जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया झाली नसल्याची माहिती आहे. या प्रक्रियेला वेग येणे गरजेचे आहे. नदीपात्र जवळपास सव्वा किमी अंतरावर असल्याने पाण्याचा प्रवाह तेलंगणाच्या बाजूने आहे. महाराष्ट्राच्या बाजूने रेतीचे पात्र असल्याने सध्या कामाची सुरूवात महाराष्ट्राच्या बाजूने नदीपात्रात सुरू करण्यात आली आहे. यंत्र सामग्रीच्या सहाय्याने मागील दोन महिन्यांपासून सदर काम सुरू असल्याने सध्या प्राथमिक स्तरावरील कामाला वेग आलेला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पुरामुळे नदीपात्रातील प्रकल्पाच्या कामात व्यत्यय येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
‘मेडिगड्डा’चे काम सुरू
By admin | Published: June 23, 2017 12:51 AM