लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : आलापल्ली-एटापल्ली-हालेवारा या ५० किमीच्या मार्गाचे नूतनीकरण करण्याच्या कामाला तीन वर्षांपूर्वीच निधी व मंजुरी प्राप्त झाली. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे तीन वर्षांपासून वर्क ऑर्डर रखडली हाेती. कंत्राटदाराला नुकतीच वर्कऑर्डर देण्यात आली आहे. एटापल्ली-आलापल्ली हा दाेन तालुक्यांना जाेडणारा रस्ता आहे. त्यामुळे या मार्गावरून वाहनांची वर्दळ राहते. तीन वर्षांपूर्वी सुरजागड येथून लाेहखनिज चंद्रपूर जिल्ह्यात नेले जात हाेते. यावेळी ट्रकची वर्दळ राहत हाेती. १६ जानेवारी २०१८ राेजी लाेहखनिज नेणाऱ्या एका ट्रकची बसला धडक बसली. या धडकेत पाच जण ठार झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी जवळपास २५ ट्रकांना आग लावली. तेव्हापासून हा रस्ता दुरूस्त करावा, अशी मागणी जाेर धरू लागली. शासनाने निधी उपलब्ध करून देऊन कामाची निविदा काढली. निविदेची प्रक्रिया आटाेपल्याला आता तीन वर्षांचा कालावधी उलटत चालला आहे. तरीही अजूनपर्यंत रस्ता नूतनीकरणाच्या कामाला सुरूवात झाली नाही. काही महिन्यांपूर्वी खड्ड्यांमध्ये गिट्टी व माती टाकण्यात आली हाेती. ही माती व गिट्टी आता रस्त्यावर जमा झाली आहे.
छत्तीसगड राज्यातून जड वाहनांची वाहतूक आलापल्ली-एटापल्ली-जारावंडी हा ८५ किमी अंतराचा मार्ग पुढे छत्तीसगड राज्याच्या प्रमुख मार्गाला जाऊन मिळते. सिराेंचा मार्गे ही वाहने तेलंगणा राज्यात जातात. या जड वाहनांची रात्रंदिवस वर्दळ राहत असल्याने मार्गाची दुर्दशा झाली आहे.विद्यमान कंत्राटदार काम करण्यास तयार नसेल तर त्याच्याकडून काम काढून ताे दुसऱ्या कंत्राटदाराला देण्याची गरज आहे.
आलापल्ली ते चाेखेवाडा या ५१ किमी अंतर असलेल्या रस्त्याच्या कामाचे वर्कऑर्डर २८ ऑक्टाेबर २०२० ला संबंधित कंत्राटदाराला देण्यात आले आहे. वर्कऑर्डर दिल्यानंतर दाेन वर्षांची मुदत दिली जाते. या कामाच्या पाहणीसाठी अभियंत्याची नियुक्ती करायची आहे. हे काम लवकरच सुरू करण्याचे बांधकाम विभागाचे प्रयत्न आहेत. - दिलीप ठाकूर, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, आलापल्ली