देसाईगंजातील चुनाभट्टी मार्ग : नागरिकांवर इतरत्र राहण्याची आली वेळ देसाईगंज : येथील चुनाभट्टीकडे जाणाऱ्या मार्गावर रेल्वे प्रशासनाकडून सांडपाणी वाहणाऱ्या नाल्यावरील रूळालगतचे बांधकाम करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. परंतु सांडपाणी जाण्याचा मार्ग बंद झाल्याने लगतच्या घरांमध्ये सांडपाणी शिरले. त्यामुळे येथील नागरिकांवर स्वत:चे घर सोडून शेजाऱ्यांच्या घरी राहण्याची वेळ आली आहे. रेल्वेच्या या कामामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. रेल्वे रूळाखालून सांडपाणी वाहणाऱ्या नाल्यावरील पुलाचे बांधकाम मागील दोन महिन्यांपासून सुरू केल्याने सांडपाणी जाण्याचा मार्ग पूर्णत: बंद झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या घरात सांडपाणी शिरले. यापूर्वी नगर पालिका प्रशासनाकडे सदर समस्येची तक्रार करण्यात आली होती. परंतु पालिका प्रशासनासह रेल्वे प्रशासनानेही या समस्येची दखल न घेतल्याने सदर स्थिती उद्भवली आहे. रेल्वे प्रशासनाकडून सुरू असलेल्या विविध कामांमुळे या परिसरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कन्नमवार नगर, जवाहर वॉर्डातील सांडपाणी रूळाखालून वाहत जाऊन रेल्वे स्थानकाच्या बाजुला असलेल्या डबक्यात जात असते. घरांत पाणी शिरल्यामुळे या परिसरातील नागरिकांना शेजाऱ्यांच्या घरी राहण्याची वेळ आली आहे. विकास कामे करीत असताना कोणत्याही सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, याची दखल विभागाने घ्यावी, अशा सूचना शासनास्तरावर असतानाही स्थानिक नगर पालिका व रेल्वे प्रशासन शासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत आहे. परिणामी येथील नागरिकांमध्ये दोन्ही प्रशासनाविरोधात तीव्र रोष व्यक्त होत आहे. (वार्ताहर)बांधकामासाठी अडविले पाणीरेल्वेस्थानक विस्ताराचे काम जोमाने सुरू करण्यात आल्याने विस्ताराच्या कामात बांधकाम करण्यासाठी सांडपाणी पूर्णपणे अडविण्यात आले. मात्र साचलेले पाणी रेल्वे रूळालगतच्या नागरिकांच्या घरात शिरले. या भागातील नागरिकांनी वेळीच नगर पालिका प्रशासनाकडे तक्रार केली. काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदारालाही यासंदर्भात सांगण्यात आले. मात्र रेल्वे व नगर पालिका प्रशासनानेही नागरिकांच्या तक्रारीकडे पूर्णत: दुर्लक्ष केले. त्यामुळे सोमवारी नागरिकांच्या घरांत सांडपाणी शिरले. बांधकामासाठी पाणी अडविताना परिसरातील नागरिकांचा विचार करणे गरजेचे होते. मात्र नागरिकांचा विचार करण्यात आला नाही.
रेल्वेच्या कामाने सांडपाणी घरांत
By admin | Published: February 09, 2016 1:14 AM