चिखली येथे आर. एम. रिठे या ग्रामसचिव म्हणून पदस्थ आहेत. त्या वैद्यकीय कारणामुळे ४ मेपासून अनुपस्थित आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीचा दैनंदिन कामकाज प्रभावित झाला आहे. गावातील तेंदूपत्ता संकलनाची मजुरीची रक्कम संबंधित कंत्राटदाराने ग्रामकोष समितीच्या खात्यात जमा केलेली आहे. मात्र सचिवाच्या अनुपस्थितीमुळे मजुरांना ती रक्कम देता येत नाही. मजुरांचा मोठा रोष पदाधिकाऱ्यांना सहन करावा लागत आहे. मजुरीची रक्कम लवकर न मिळाल्यास ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशारासुद्धा काही गावकऱ्यांनी दिला आहे.
नालेसफाई, दिवाबत्ती नियोजन, मंजूर नवीन पाणीपुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया राबविणे व इतर दैनंदिन कामकाजही रखडलेले आहे. येथील तात्पुरता प्रभार नान्ही येथील ग्रामसेवक कोहरे यांचाकडे सोपविण्यात आला आहे. मात्र त्यांचाकडे आर्थिक अधिकार नसल्याने तसेच ग्रामपंचायतीचा रेकाॅर्ड असलेल्या कपाटाच्या किल्ल्यासुद्धा रिठे यांचाचकडे असल्याने या प्रभाराला काहीच अर्थ नाही. येथील पदाधिकाऱ्यांनी अनेकदा सचिव रिठे यांचाशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्या फाेन उचलत नाहीत, असा आराेप गावकऱ्यांनी केला आहे.
याबाबत संवर्ग विकास अधिकारी अनिता तेलंग यांचाकडेही तक्रार केली आहे. मात्र त्यांच्याकडूनही समाधानकारक तोडगा निघाला नाही. तत्काळ ही अडचण दूर करण्यात यावी, अशी मागणी येथील सरपंच सविता कुमरे, उपसरपंच वासुदेव बहेटवार व ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे