वडिलाचे छत्र हरविले : तुळशीच्या भोजराज देशमुखचे यश गरीब विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायीविष्णू दुनेदार । लोकमत न्यूज नेटवर्कतुळशी : घरची आर्थिक परिस्थिती हलाकीची असल्याने तुळशी येथील भोजराज अशोक देशमुख या दहावीतील विद्यार्थ्याने शनिवारी व रविवारी सुटीच्या दिवशी बूट हाऊसमध्ये काम केले. तरीही अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. त्याचाच परिणाम दहावीच्या परीक्षेत दिसून आला असून त्याने तब्बल ७४ टक्के गुण घेतले आहेत. भोजराज देशमुख हा तुळशी येथील शिवाजी विद्यालयात शिकत होता. त्याच्या कुटुंबात वडील, आई, आजी, लहान बहिण आहे. वडील सरपण विकून कुटुंबाचा गाळा ओढत होते. मात्र २०१५ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर कुटुंबाची पूर्ण जबाबदारी भोजराजच्या आईच्या खांद्यावर आली. आईच्या मजुरीच्या भरवशावर कुटुंब चालविणे शक्य नसल्याने समजदार असलेल्या भोजराजने सातवीत असतापासून सुटीच्या दिवशी मजुरी करून आईला हातभार लावला. दहावीची परीक्षा संपल्यानंतर पुन्हा देसाईगंज येथील बुट हाऊसमध्ये काम केले. भोजराजला अभिनयाची आवड आहे. पदवीधर झाल्याबरोबर स्पर्धा परीक्षेची तयारी करून नोकरी मिळविण्याचे त्याचे स्वप्न आहे. भोजराजचे हे यश गरीब कुटुंबातील इतर विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारे आहे.
बूट हाऊसमध्ये काम करून मिळविले ७४%
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2017 12:50 AM