गडचिराेली : जागतिक कर्कराेग पंधरवडा ४ ते २२ फेब्रुवारीदरम्यान राबविण्यात आला. या पंधरवड्यात वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका, समुदाय आराेग्य अधिकारी, आशा सेविका यांची माैखिक आराेग्य, स्तनाचा कर्कराेग, गर्भाशयाचा कर्कराेग आदी तपासणी करण्यात आली. राष्ट्रीय असंसर्गजन्य राेग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. अनिल रूडे, अतिरिक्त शल्य चिकित्सक डाॅ. सतीशकुमार साेलंके, बाह्य संपर्क वैद्यकीय अधिकारी डाॅ. बागराज धुर्वे, महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. दीपचंद साेयाम, प्रमुख मार्गदर्शक म्हणून दंत चिकित्सक डाॅ. चंद्रशेखर शानगाेंडा, स्त्रीराेगतज्ज्ञ डाॅ. प्रियंका शेडमाके, डाॅ. नंदू मेश्राम, नीलेश सुभेदार आदी उपस्थित हाेते.
याप्रसंगी डाॅ. दीपचंद साेयाम यांनी सामान्य कर्कराेग व महिलांच्या आराेग्याविषयी माहिती दिली. डाॅ. बागराज धुर्वे यांनी जिल्ह्यात संशयित रुग्ण आढळल्यास समुदाय आराेग्य अधिकारी व आशांनी रुग्णाला संदर्भीत करावे, अशी सूचना दिली. डाॅ. अनिल रूडे यांनी रुग्णालयातील मेमाेग्राॅफी, काॅल्पाेस्काॅपी, केमाेथेरेपी आदी सुविधा तसेच महात्मा जाेतिबा फुले जनआराेग्य याेजनेंतर्गत कर्करुग्णांसाठी असलेल्या माेफत औषधाेपचाराविषयी सांगितले. आत्तापर्यंत केमाेथेरेपी युनिटमार्फत ११० कर्करुग्णांना प्रत्येकी १ हजार ५०० रुपये अर्थसाहाय्य देण्यात आल्याचे सांगितले. कार्यशाळेत उपस्थित सर्व महिला कर्मचाऱ्यांची मुख, गर्भाशय, स्तनाचा कर्कराेग, माैखिक कर्कराेग आदींची तपासणी करण्यात आली. डाॅ. शानगाेंडा यांनी माैखिक स्वच्छता व दात घासण्याचे तंत्रज्ञान याबाबत सांगितले. सूत्रसंचालन मीना दिवटे तर आभार राहुल कंकनालवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी डाॅ. सराेज भगत, दिनेश खाेरगडे, सुनील राजुरकर, सुनील भिसे, रिना मेश्राम, वैशाली बाेबाटे, शिल्पा सरकार यांनी सहकार्य केले.