महेंद्रकुमार रामटेके आरमोरी आरमोरी तालुक्यातील चार जिल्हा परिषद क्षेत्र व आठ पंचायत समिती गणात काँग्रेस, भाजपा, सेना, राकाँसह सर्वच राजकीय पक्षांनी नवख्या उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरविल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रचाराचा धुराळा गावागावात उडत असून राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या विजयासाठी प्रचाराला जोमात सुरुवात केली आहे. त्यामुळे आरमोरी तालुक्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात केली आहे. आरमोरी तालुक्यात चार जिल्हा परिषद क्षेत्रांसाठी २३ तर ८ पंचायत समिती गणासाठी ३६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. काँग्रेस, भाजपाने चारही जिल्हा परिषद क्षेत्रात आपले उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जिल्हा परिषद क्षेत्रातून आपले उमेदवार उभे केले आहेत. बसपा आणि भाकपानेही प्रत्येकी एक जिल्हा परिषद क्षेत्रातून आपले उमेदवार उभे केले आहेत. निवडणूक प्रचार संपण्याला केवळ दोन ते तीन दिवसांचा कालावधी शिल्लक असताना आरमोरी तालुक्यात अजूनपर्यंत एकाही मोठ्या नेत्याची सभा झाली नाही. स्थानिक नेत्यांनाच प्रचाराची धुरा सांभाळावी लागत असल्याचे दिसून येत आहे. ठाणेगाव-इंजेवारी जिल्हा परिषद क्षेत्रातून सर्वाधिक ८ उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसकडून आशा शेंडे, भाजपाकडून मितलेश्वरी खोब्रागडे, शिवसेनेकडून मायादेवी गेडाम, राकाँकडून पूजा प्रकाश खोब्रागडे, बसपाकडून किरण धनपाल शेंडे तर अपक्ष म्हणून वेणुताई ज्ञानेश्वर ढवगाये, प्रीती किसनराव शंभरकर, रेखा सूरज वाळके हे उमेदवार उभे आहेत. अनुसूचित जाती महिला उमेदवारासाठी सदर क्षेत्र राखीव आहे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे. दोन दिग्गज बंडखोर उमेदवारांचा प्रभावही प्रचारादरम्यान अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे या क्षेत्रात बहुरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सिर्सी-वडधा जिल्हा परिषद क्षेत्रात आजपर्यंत काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. यावेळी मात्र काँग्रेसमध्ये बंडखोरी उफाळून आल्याने त्याचा सामना पक्षाच्या उमेदवाराला करावा लागत आहे. या क्षेत्रातून काँग्रेसकडून वनीता सहाकाटे, भाजपाकडून गीता सुब्रमन कंगाले, अपक्ष म्हणून शीला भजनराव उसेंडी, छाया सुधाकर मडावी या उभ्या आहेत. आपला गड कायम ठेवण्यासाठी काँग्रेसच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. वैरागड-मानापूर जिल्हा परिषद क्षेत्रात सात उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसकडून केशव तुळशिराम गेडाम, भाजपाकडून संपत यशवंत आडे, राकाँकडून जगदीश पेंदराम, शिवसेनेकडून नेताजी वासुदेव नारनवरे, भाजपकडून रोहिदास कुमरे तर अपक्ष म्हणून किशोर यादव गेडाम, मनेश्वर मारोती मडावी उभे आहेत. या क्षेत्रातही चुरसीची लढत होणार आहे. पळसगाव-अरसोडा क्षेत्रात शिवसेनेकडून लक्ष्मी हरीश मने, काँग्रेसकडून मनीषा मधुकर दोनाडकर, भाजपकडून सविता सेवकदास दर्वे, तर राकाँकडून वैशाली डोंगरवार उभ्या आहेत. यावेळीही या क्षेत्रात जुनीच लढत अनुभवायला मिळणार आहे. या क्षेत्रात आजपर्यंत शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी ही लढाई प्रतिष्ठेची बनली आहे. चारही जि. प. क्षेत्रांच्या निवडणुकीकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
आरमोरी क्षेत्रात निवडणूक महायुद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2017 2:01 AM