सोमवारी जिल्हा परिषदेसमोर धरणे : प्रशासकीय काम खोळंबण्याची शक्यतागडचिरोली : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कृषी तांत्रिक कर्मचारी सहकारी संघटना शाखा गडचिरोलीच्या वतीने ३ आॅक्टोबरपासून बेमुदत लेखणीबंद आंदोलनास सुरुवात केली असून जिल्हा परिषदेसमोर जिल्ह्यातील कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी धरणे दिली.जिल्हा परिषदेकडील कृषी विस्तार अधिकारी यांची इतर विस्तार अधिकारी संवर्गाप्रमाणे सेवा ज्येष्ठता विभागीय स्तरावर ठेवण्यात यावी, कृषी अधिकारी वर्ग-३ यांना वर्ग-२ चा दर्जा देऊन राज्य संवर्गात समाविष्ट करण्यात यावे, जिल्हा परिषदेकडील कृषी अधिकारी यांच्या महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग-२ मध्ये रोखण्यात आलेल्या पदोन्नती तातडीने देण्यात यावी, जिल्हा परिषदेकडील कृषीविषयक योजना राज्य कृषी विभागाकडे हस्तांतरित झाले आहेत. त्या पुन्हा जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात याव्या, या मागण्यांसाठी २०१२ पासून सतत पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र न्याय मिळाला नाही. त्यामुळे १५ जून २०१६ रोजी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले होते. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.१८ जुलै रोजी कृषी आयुक्तालय पुणे येथे व १८ आॅगस्ट रोजी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन करण्यात आले. परंतु न्याय मिळाला नाही. त्यामुळे ३ आॅक्टोबरपासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. फक्त सोमवारीच जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मंगळवारपासून संपूर्ण अधिकारी व कर्मचारी आपल्या कार्यालयात बसतील, मात्र मागण्या मान्य होईपर्यंत काम करणार नाहीत.धरणे आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष श्रीकृष्ण पेंदाम, सचिव प्रदीप राऊत, कार्याध्यक्ष दुधे, कोषाध्यक्ष प्रताप कोपनार, सहसचिव ठाकरे, सल्लागार बोरावार, थोटे, गेडाम यांच्याह जिल्हाभरातील सर्व कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी सहभागी झाले होते. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांनी दिला आहे. कृषी अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांच्या लेखनीबंद आंदोलनामुळे प्रशासकीय कामकाज खोळंबण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (नगर प्रतिनिधी)
कृषी अधिकाऱ्यांचे लेखणीबंद आंदोलन
By admin | Published: October 04, 2016 12:57 AM